लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांची प्रतीक्षा

औरंगाबाद  : औरंगाबाद शहरात  ४५ वर्षांवरील नागरिकांकडून लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसल्याने ३५ हजार लशी शिल्लक आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी केले आहे. लसीमुळे करोनापासून सुरक्षा कवच मिळते.

करोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू केली. महापालिकेनेही लसीकरणाला वेग देण्यासाठी ११५ वॉर्डात प्रत्येकी एक या प्रमाणे लसीकरण केंद्र सुरू केले. मार्च, एप्रिल महिन्यात करोनाची दुसरी लाट तीव्र असताना लसीकरणाला प्रतिसाद मिळाला. संसर्गाचा अधिक धोका असण्याच्या काळात लसीकरण केंद्रावर लांबच लांब रांगा लागत होत्या. पण आता मात्र लसीकरणाकडे पुन्हा दुर्लक्ष केले जात आहे. लशीची मागणी असतानाही पुरवठा  कमी होता.  १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला.  सरकारने ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करताना कोविशिल्ड लसीच्या दोन मात्रेतील  अंतर ८४ दिवस केले. त्यामुळे लसीकरण केंद्रावरील गर्दी अचानक कमी झाली. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला  स्थगिती देण्यात आल्यामुळे लसीकरण केंद्रावर सध्या शुकशुकाट दिसून येत आहे.

विद्यार्थी, दिव्यांग, बेघर आणि ओळखपत्र नसणाऱ्याचे लसीकरण

महापालिकेने ४५ वर्षांवरील नागरिकांकडून लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे विदेशात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी  व नोकरीला जाणाऱ्या व्यक्तींचे  लसीकरण केले जात आहे.  मोटारीतून या आणि लस घ्या अशी मोहीमही सुरू करण्यात आली आहे. तसेच दिव्यांग, बेघर आणि ओळखपत्र नसलेल्या नागरिकांचे लसीकरण केले जात आहे.  परदेशी शिक्षणाला जाणारे विद्यार्थी व नोकरीला जाणाऱ्या नागरिकांना लशीचा दुसरा डोस घेण्यासाठी २८ दिवसानंतर परवानगी दिली आहे.

पंधरा दिवसांत ४१ हजार लशी प्राप्त

राज्य सरकारकडून ४५ वर्षांवरील नागरिकांच्या पहिल्या व दुसऱ्या मात्रेसाठी पंधरा दिवसात ४१ हजार लस मिळाली. अगोदर मनपाकडे ८ हजार लस शिल्लक होती. गेल्या पाच दिवसात सुमारे पाच हजार जणांचे लसीकरण झाले. त्यामुळे ३५ हजार लस अद्यापही शिल्लक आहे.

लसीकरणासाठी जनजागृती मोहीम

४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण केंद्रात व्यवस्था करण्यात आली असलीतरी नागरिकांकडून लसीकरणाला प्रतिसाद मिळत नाही. अनेक केंद्रावर एकही लस न देताच कर्मचारी परत येत आहेत. अजूनही अनेक जण लसीकरणापासून दूर असल्याचा महापालिकेचा अंदाज आहे. त्यामुळे पुन्हा लसीकरण जागृती करणे आवश्यक बनू लागले आहे.