नांदेड, हिंगोली करोनामुक्त; जालना, परभणी, हिंगोलीमध्ये प्रत्येकी एक रुग्ण

औरंगाबाद : मराठवाडय़ातील आठ जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी दुपापर्यंत ४२ करोनाबाधित रुग्णसंख्या होती. त्यातील सर्वाधिक रुग्ण संख्या औरंगाबाद येथे असून त्यातील दोघांचा मृत्यू तर दोघे जण बरे झाले आहेत. जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात प्रत्येकी एक, लातूरमध्ये आठ तर उस्मानाबादमध्ये तीन करोनाबाधित होते. त्यातील हिंगोलीतील रुग्ण पूर्णत: बरा झाला आहे. नांदेड जिल्ह्यात अद्यापि एकही करोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही. तसेच बीड जिल्ह्यातील एका रुग्णावर अहमदनगरमध्ये उपचार सुरू आहेत. आजपर्यंत मराठवाडय़ातील आठही जिल्ह्यांत दोन हजार ८७४ नमुने तपासणीस घेण्यात आले असून त्यापैकी दोन हजार ५८७ अहवाल करोना चाचणीला नकारात्मक आले आहेत. ५८४ व्यक्तींचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले.

गेल्या २४ तासांत जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी १०२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील ८९ जणांचे अहवाल करोना चाचणीला नकारात्मक आले. आतापर्यंत औरंगाबाद शहरात २८ रुग्ण आढळले असून दोघांचा मृत्यू झाला असून दोन रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील जिल्हा रुग्णालयात २२, खासगी रुग्णालयात एक तर शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात एका रुग्णावर उपचार सुरू आहेत. अद्याप २९ अहवाल येणे बाकी आहे.

भारतीय बनावटीच्या व्हेंटिलेटरचा अभ्यास

औरंगाबाद शहरात व्हेंटिलेटरची तशी कमतरता भासणार नाही असा विभागीय प्रशासनाचा दावा आहे. मात्र, हिंगोली व परभणी जिल्ह्यांमध्ये व्हेंटिलेटरची कमतरता भासू शकते. अलिकडेच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी त्यांच्या निधीतून व्हेंटिलेटर घेण्यास परवानगी दिली असून कमतरता असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये तो निधी देण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सांगितले. दरम्यान, भारतीय बनावटीचे व्हेंटिलेटर आणि अत्याधुनिक व्हेंटिलेटरमध्ये फक्त काही नोड कमी असतात. बाकी सर्व अर्थाने भारतीय बनावटीचे व्हेंटिलेटरही साथरोगाच्या नियंत्रणासाठी उपयोगी ठरतील, असा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दावा आहे. दरम्यान, परभणी, हिंगोली आणि उस्मानाबाद जिल्ह्यात व्हेंटिलेटरची कमतरता असल्याचे सांगण्यात येत आहे.

कंगना राणावतच्या बहिणीविरुद्ध तक्रार

तबलीगीच्या विरोधात समाजमाध्यमांमध्ये तेढ निर्माण करणारा मजकूर लिहिल्याप्ररकणी कंगना राणावत यांची मोठी बहीण रंगोली चंदेल यांच्या विरोधात औरंगाबाद येथील अ‍ॅड्. खिरज पटेल यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.