मुले गेली कुठे? शोधण्यासाठी सर्वेक्षण

हजेरीपट नोंदणीनुसार २०१४-१५ या शैक्षणिक वर्षांतील आलेली विद्यार्थी संख्या युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फम्रेशन सिस्टीम फॉर एज्युकेशनमध्ये (युडीएस) नोंद करण्यात आली होती. ही संख्या २०१५-१६ या वर्षांत वाढण्याऐवजी १८ हजार ६५८ ने कमी झाली आहे. एवढे विद्यार्थी हजेरीपटावरून गायब झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना शाळाबाहय़ समजून शिक्षण विभागाने त्यांची शोधमोहीम हाती घेतली आहे.

त्यापूर्वी शिक्षण विभागाने डिसेंबर २०१५ मध्ये घरोघरी जाऊन शाळाबाहय़ विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले होते. त्यात जिल्हय़ात ६९६ विद्यार्थी शाळाबाहय़ आढळून आले होते. त्यापूर्वीच सप्टेंबर २०१५ मध्ये झालेल्या पटपडताळणीत १८ हजार ६५८ विद्यार्थ्यांची गळती झाली होती. अशा या भीषण परिस्थितीत कमी संख्येने विद्यार्थी शाळाबाहय़ आढळून आल्याने गळती झालेले विद्यार्थी नेमके कुठे गेले, याचा शोध शिक्षण विभागाने सुरू केला आहे. यात सर्वाधिक ४ हजार ७३३ विद्यार्थी लातूर तालुक्यातून हरवले आहेत. तर उदगीर तालुक्यातून २ हजार ७९३ विद्यार्थी बेपत्ता झाले आहेत.

गळती झालेली मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आहेत की नाहीत, याचा शोध घेण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, रेणापूर वगळता एकाही तालुक्याचा अहवाल त्यांच्याकडे उपलब्ध नाही. रेणापूर तालुक्यातून १ हजार ८० विद्यार्थ्यांची गळती झाली. प्रत्यक्षात ६४ विद्यार्थी शाळाबाहय़ असल्याचा अहवाल आला आहे. त्यामुळे गळती झालेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेताना शिक्षण विभागाची मोठी कसरत होत आहे. तालुकानिहाय शाळाबाहय़ व गळती झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे- चाकूर शाळाबाहय़ विद्यार्थी १०१, प्रत्यक्षात गळती झालेले विद्यार्थी १ हजार ६४५. अहमदपूर शाळाबाहय़ विद्यार्थी ११, प्रत्यक्ष गळती झालेले विद्यार्थी ९४०. जळकोट शाळाबाहय़ विद्यार्थी २६, प्रत्यक्षात गळती झालेले विद्यार्थी २ हजार १११. लातूर ग्रामीण शाळाबाहय़ विद्यार्थी २१, प्रत्यक्षात गळती झालेले विद्यार्थी २ हजार ८४. लातूर शहर पूर्व शाळाबाहय़ विद्यार्थी १०५, प्रत्यक्षात गळती झालेले विद्यार्थी २ हजार ६३९, लातूर शहर पश्चिम शाळाबाहय़ विद्यार्थी १५१, प्रत्यक्षात गळती झालेले विद्यार्थी १००. रेणापूर शाळाबाहय़ विद्यार्थी ६४, प्रत्यक्षात गळती झालेले विद्यार्थी १ हजार ८०. औसा शाळाबाहय़ विद्यार्थी ७९, प्रत्यक्ष गळती झालेले विद्यार्थी २ हजार १७०. निलंगा शाळाबाहय़ विद्यार्थी ३९, प्रत्यक्ष गळती झालेले विद्यार्थी २ हजार ७७, उदगीर शाळाबाहय़ विद्यार्थी ३६, प्रत्यक्ष गळती झालेले विद्यार्थी २ हजार ७९३. देवणी शाळाबाहय़ विद्यार्थी २३, प्रत्यक्ष गळती झालेले विद्यार्थी ५५३. शिरूर अनंतपाळ शाळाबाहय़ विद्यार्थी २३, प्रत्यक्ष गळती झालेले विद्यार्थी ६५७.

शिक्षण विभागाने डिसेंबरमध्ये घरोघरी जाऊन केलेल्या सर्वेक्षणात ७०० शाळाबाहय़ विद्यार्थी आढळून आले. मात्र, युडीय प्रणालीतून आलेल्या संख्येनुसार १८ हजारांहून अधिक विद्यार्थी हरवलेले आहेत. या हरवलेल्या विद्यार्थ्यांना शाळाबाहय़ समजून शिक्षण विभागाने त्यांचा शोध सुरू केला आहे, पण हरवलेल्यांपकी एकही विद्यार्थी सापडत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे पटावरून हरवलेले विद्यार्थी नेमके गेले कुठे? जर ते कुठे गेलेच नाहीत तर ते पटावर कशासाठी आले होते? त्यांना पटावर आणण्यामागील गौडबंगाल काय? यासह अनेक प्रश्नांनी शिक्षण विभागाला चक्रव्यूहात अडकवले आहे.

हरवलेल्या विद्यार्थ्यांचा १९ गावात शोध सुरू : पंचगले

युडीएस प्रणालीनुसार हरवलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी दि. ३, ४ व ५ ऑगस्ट रोजी चाकूर तालुक्यातील लातूररोड, वडवळ नागनाथ, अजनसोंडा, चाकूर अशा मोठय़ा १९ गावांमध्ये विशेष कॅम्प लावण्यात आला आहे. या कॅम्पच्या माध्यमातून शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, गटसाधन केंद्राचे तज्ज्ञ व्यक्ती गळती झालेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेत आहेत. गरज भासल्यास कॅम्पच्या दिवसात आणखीन वाढ करण्यात येईल. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार काही विद्यार्थ्यांनी टीसी काढून दुसरीकडे प्रवेश घेतला आहे, तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या टीसी नेमक्या कुठे गेल्या आहेत, याचा शोध घेणे चालू असल्याचे गटशिक्षणाधिकारी संजय पंचगले यांनी सांगितले. तर, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे अधिकारी संजयकुमार राठोड यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.