सिल्लोड मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार बुधवारी अचानक महाजनादेश यात्रेच्या रथावरच पाहायला मिळाले. त्यामुळे भाजप नेत्यांसह कार्यकर्त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. गेल्या काही दिवसांपासून सत्तार भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक होते. मात्र, स्थानिकांनी त्यांना प्रवेश दिला जाऊ नये, अशी गळ मुख्यमंत्र्यांना घातली होती. मात्र, रथयात्रेच्या बसमध्ये त्यांनी प्रवेश मिळविला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाजनादेश यात्रा बुधवारी सिल्लोडमध्ये पोहोचली. या वेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह यात्रेत सहभागी होणाऱ्या नेत्यांमध्ये सत्तार यांनी प्रवेश मिळविला. तत्पूर्वी भाजप पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर सिल्लोड येथील प्रियदर्शिनी चौकातील सत्तार यांनी उभारलेला स्वागताचा मंच पोलिसांनी ताब्यात घेतला होता. सत्तार यांची कोंडी करण्याचा स्थानिक भाजपच्या नेत्यांचा प्रश्न असताना फुलंब्रीहून येणाऱ्या रथात सत्तार यांनीही प्रवेश मिळविला. सिल्लोड शहरात येईपर्यंत सत्तार मुख्यमंत्र्यांसमवेत रथावर सोबत उभे होते. यामुळे भाजपमध्ये त्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असल्याचा दावा सत्तार समर्थक करत असले, तरी त्यांना अधिकृत प्रवेश मिळेल का, याचे अद्याप उत्तर मिळालेले नाही.