औरंगाबादेत ‘चाए-पे-शादी’चा १०५ वा अनोखा प्रयोग

शोएब गुलाबाची चार फुलं चिटकवलेल्या किरायाच्या कारमधून उतरला. तीन मित्र आणि वडील, असे चार जण मागच्या सीटवर दाटीवाटीतच बसलेले होते. नवाच पण माफक किमतीचा नवरदेवाचा पोशाख त्याच्या अंगावर. मुस्कान नांदेड जिल्ह्य़ातील कंधारमधून आलेली, वडील नसलेली. मामा-मामी-आजी-आजोबा हे तिचे गणगोत. काझीसाहब हाफिज मोहंमद शरीफ यांनी ‘निकाह’ विधी पूर्ण केला. दोन मिनिटं २०-२५ जणांनी प्रार्थना केली. मुबारक हो. मुबारक हो. असे संयमी स्वर बाहेर पडले आणि वऱ्हाडी मंडळींच्या हाती आला फक्त एक चहाचा कप. एका बाजूला विवाह सोहळ्यावर ‘रावसाहेबी’ खर्च होत असताना हारून मुक्ती फाऊंडेशनच्या वतीने असे १०४ विवाह सोहळे पूर्वी साधेपणाने केले गेले आहेत. याच ‘सादगी’तून सोमवारी शोएब आणि मुस्कान यांचे रेशीमबंध जुळून आले. तेव्हा पुन्हा एकदा ‘एक कप चाय और हो जाए,’ असे म्हणत सर्वानी नवदाम्पत्याच्या जीवनासाठी दुआ मागितली. रोशनगेटच्या सय्यद शकील यांच्या खास इराणी चहाची चव पुन्हा एकदा आनंद देणारी ठरली.

औरंगाबादेतील जिन्सी-बायजीपुरा या गजबजलेल्या भागात सोमवारी मोजकेच वऱ्हाडी जमलेले. हुंडा, बॅण्ड, फटाके, मान-पान, मंगल कार्यालय, यावर होणाऱ्या लाखो रुपयांच्या उधळपट्टीला फाटा देऊन केवळ नवरा-नवरीसह त्यांच्याकडील पाहुण्यांनाही चहा पाजून लग्नसोहळा होतो. नवरा-नवरीचे कपडे, संसारोपयोगी साहित्य, चहा-पाण्याचा खर्च हे सर्व फाऊंडेशनकडून दिले जाते. दोन्हीकडील वऱ्हाडींनी केवळ हार घेऊन यायचे, एवढेच त्यांना सांगितले जाते. फाऊंडेशनने मागच्या दोन-अडीच वर्षांत आयोजित केलेला सोमवारचा १०५ वा लग्नसोहळा होता. आणखी दोन दिवसांनी एक सोहळा आहे. त्याला जिल्हा, विभाग, प्रदेश असे कुठलेही बंधन नाही. रीतिरिवाज सोडण्याची इच्छा आणि चहावर लग्न उरकण्याची मनाची तयारी असेल तर हुंडय़ासारख्या गरिबांना न परवडणाऱ्या प्रथा बंद होऊ शकतात, असे फाऊंडेशनचे प्रमुख युसूफ हारूण मुकाती आवर्जून सांगतात. शोएब व त्याचे कुटुंबीय अत्यंत गरीब घरचे, औरंगाबादजवळच्या जटवाडा भागातील. वडील वेल्डिंगचे काम करणारे. एक लहान भाऊ. शोएब एका कपडय़ाच्या दुकानात काम करतो. गरीब कुटुंबातील म्हणून पोरगीही आपल्याला श्रीमंताच्या घरातून चालून येणारी नाही, हे जाणून असलेला. वडील शेख साबेर शेख ख्वॉजा यांनाही त्याच्या लग्नाची चिंता होती. फाऊंडेशनकडून चाय-पे-शादी आयोजिली जाते, हे त्यांना शेख शफियोद्दीन निजोमोद्दीन यांच्याकडून समजले. चाय-पे-शादीसाठी शेख शफियोद्दीन यांचा पुढाकार असतो. त्यांच्याकडे मुला-मुलींसाठीचे बरेच ठिकाण असतात. कोणी विचारले तर ते त्यांना सुचवतात. आपण मोठे लग्न करावे, समोर मित्र जल्लोष करणारे, अनेकांना निमंत्रित करण्याची हौस बाळगून ती पूर्ण करण्याची इच्छा झाली नाही का, यावर शोएब सांगतो, ‘‘परिस्थितीचा विचार महत्त्वाचा असतो. शिवाय इस्लाममधील हुंडा न घेण्याची सुन्नत पद्धतही अवलंबता येते. हा नबीचा महिना आहे. तो शुभ मानला जातो.’’ शोएबचा मित्र वसीम म्हणाला, ‘‘चाय-पे-शादीची कल्पना शोएबच्या आईला भावली आणि त्यांनी त्या निकाहासाठी आग्रहच धरला.’’

मुस्कानचे मामा शेख अय्युब अब्दुल रज्जाक म्हणाले, ‘‘हुंडा देऊन मोठा सोहळा करण्याची ऐपत नाही. आम्ही मोलमजुरी करणारे. मुस्कानला वडील नाहीत. जबाबदारी आमच्यावरच होती. माझी बहीण औरंगाबादेत असते. तिने चाय-पे-शादीची कल्पना समोर ठेवली आणि आम्हाला पसंत पडली.’’ काझी हाफिज मोहंमद शरीफ यांनी निकाहाबाबत सर्वासमोर बोलताना, आजकाल मोठय़ा हुंडय़ापायी आई-वडिलांना मुलींचे लग्न कसे करावे, याचा प्रश्न पडला आहे. सोहळ्यातील दिखाऊपणात लाखो रुपयांची उधळपट्टी होते, याची खंत व्यक्त केली.