देशभरात सुरू असलेले पुरस्कार परतीचे लोण आता नांदेडपर्यंत पोहोचले आहे. जिल्ह्यातील लोह्याचे साहित्यिक व कवी प्रभाकर सोनकांबळे यांनी राज्य सरकारच्या उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा पुरस्कार परत केला आहे.
सोनकांबळे यांना २००५ मध्ये उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा राज्य सरकारचा पुरस्कार प्राप्त झाला होता. सन्मानपत्र, ५ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. देशभरात सुरू असलेल्या वेगवेगळ्या घटनांनी व्यथित होऊन आपण हा पुरस्कार सरकारला परत करीत असल्याचे सांगत सोनकांबळे यांनी कुटुंबासह निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांची भेट घेतली व सन्मानपत्र त्यांच्याकडे सुपूर्द केले. पाच हजार रुपयांचा धनादेश कोणाच्या नावे द्यायचा याची विचारणा करून तोही सायंकाळपर्यंत परत करू, असे त्यांनी सांगितले. देशभरात ज्या काही घटना घडत आहेत त्या िनदनीय आहेत. पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात हत्येसारख्या घटना शोभनीय नाहीत. लोकशाही विचारस्वातंत्र्यावर हा घाला होय, त्याचाच निषेध म्हणून आपण पुरस्कार परत करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोिवद पानसरे, कर्नाटकातील विचारवंत कलबुर्गी यांच्या निर्घृण हत्या, दादरी घटना यामुळे अराजकता निर्माण झाल्याचे सांगत देशभरातील नामवंत साहित्यिक, लेखक, कवी व विचारवंतांपकी अनेकांनी सरकारकडून मिळालेले पुरस्कार परत करण्याचे पाऊल उचलले. देशभरात पुरस्कार परतीचे वाहत असलेले वारे नांदेडपर्यंतही धडकले आहे.