अपक्ष स्मिता घोगरे शिवसेनेच्या पाठबळावर उपमहापौर

औरंगाबाद महापालिकेसाठी महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे भगवान घडामोडे तर उपमहापौरपदी अपक्ष स्मिता घोगरे यांना विजय मिळाला. दोघांनाही ७१ मते मिळाली. शिवसेनेने अपक्ष घोगरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. शिवसेना-भाजपच्या युतीमध्ये एक वर्ष महापौरपद भाजपला देण्याचे ठरले होते. त्या सूत्रानुसार शिवसेनेचे त्र्यंबक तुपे व भाजपचे प्रमोद राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर बुधवारी निवडणुका झाल्या. जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय पीठासन अधिकारी होत्या. काँग्रेसचे महापौरपदाचे उमेदवार अयुब खान यांना १० मते मिळाली तर सायराबानो खान यांना २५ मते मिळाली. विजयानंतर भाजप व सेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून व बॅन्ड लाऊन जल्लोष साजरा केला.

औरंगाबाद महापालिकेत ११५ नगरसेवक आहेत. त्यापैकी शीतल गादगे या नगरसेविका अपात्र ठरल्याने तसेच कलिमा कुरेशी या अपक्ष नगरसेविका गैरहजर असल्याने ११३ नगरसेवक महापौर पदाच्या मतदान प्रक्रियेत सहभागी झाले. त्यातील सहा नगरसेवक तटस्थ राहिले. हात उंचावून नगरसेवकांनी मतदान झाले. यामध्ये वैशाली जाधव या नगरसेविका मतदान प्रक्रियेनंतर सभागृहात पोहचल्या. काँग्रेसचे महापौरपदाचे उमेदवार खान अय्युब महम्मद हुसेन खान यांना १० मते मिळाली.

एमआयएमच्या वतीने सायराबानो खान यांना २५ मते मिळाली. महापालिकेत एमआयएमचे संख्याबळ २५ एवढेच आहे. उपमहापौरपदाच्या निवडणुकीमध्ये अब्दुल नवीद अब्दुल रशीद यांना यांना ११ मते मिळाली. तसेच एमआयएमच्या उपमहापौरपदाचे उमेदवार खान इर्शाद इब्राहिम यांना २५ मते मिळाली. उपमहापौरपदासाठी शिवसेनेने अपक्ष उमेदवार स्मिता घोगरे यांना निवडणुकीत उतरविल्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये काहीशी नाराजी होती. ती दूर करण्यासाठी संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांना खास पाठविण्यात आले होते. त्यांनी समजूत घातल्यानंतर उपमहापौरपदी स्मिता घोगरे यांना ७१ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ नगरसेवक व बसपाचे राहुल सोनवणे यांनी मतदानादरम्यान तटस्थ रहाणे पसंत केले.

महापालिकेमध्ये भाजपचे २३ नगरसेवक आहेत तर शिवसेनेचे २८. अपक्ष १४ नगरसेवकांचा एक गट युतीच्या बाजूने उभा आहे. तसेच बसपाचे चार नगरसेवक, रिपाइंचा २ नगरसेवक युतीच्या बाजूने उभे आहेत. अपक्षांमध्ये कीर्ती शिंदे, जोहरा नासेर कुरेशी, गजानन बारवाल, राजू तनवाणी, स्मिता घोगरे, चव्हाण, संगीता सानप, गोपाळ मलके, रूपचंद वाघमारे, स्वाती नागरे, दामुअण्णा शिंदे, ज्योती अभंग, विजया बनकर, हेमलता दाभाडे, अशी अपक्ष उमेदवारांची नावे आहेत. या गटातील बहुतांश नगरसेवक भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांचे समर्थक आहेत. शिवसेना-भाजपच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या उमेदवारांना सारखी मते पडल्याने शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. उपमहापौरपदासाठी तसेच सभागृहनेते आणि गटनेता पदासाठी केलेल्या निवडीमुळे सेनेतील एक वर्ग नाराज होता. मात्र, त्याचा मतदानावर कोणताही परिणाम दिसून आला नाही. मतदान सुरू असताना शिवसेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल महापालिकेत ठाण मांडून बसले होते. भाजपचे आमदार अतुल सावे उपस्थित होते.