26 January 2021

News Flash

कुक्कुटपालन व्यावसायिकांमध्ये करोनानंतर ‘बर्ड फ्लू’ची भीती

कोंबडय़ांच्या मागणीत घट, मिळेल त्या दरात विक्रीवर भर

(संग्रहित छायाचित्र)

कोंबडय़ांच्या मागणीत घट, मिळेल त्या दरात विक्रीवर भर

औरंगाबाद : पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लू आजाराचा प्रादुर्भाव होत असल्याच्या चर्चेने मागील दोन दिवसांत कोंबडय़ांच्या मागणीतही घट होत असून करोनापाठोपाठ हे दुसरे संकट ओढवण्याच्या शक्यतेने कुक्कुटपालन करणाऱ्यांमध्ये व्यवसायात नुकसान सोसण्याची भीती पसरली आहे.

करोनाच्या काळात एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यात खरेदीदार ते खाणारे ही साखळीच तुटली होती. परिणामी मांसाहार करणाऱ्यांकडून कोंबडय़ा, चिकनची मागणी एकदम घटली. करोनाकाळात अक्षरश खड्डा करून कोंबडय़ांना पुरावे लागले होते, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. करोना काळात चिकनचा दरही २० ते ३० रुपये किलोपर्यंत घसरलेला होता. परिणामत व्यवसायावर पाणी फेरले गेले होते. ऑगस्टनंतरपासून टाळेबंदी टप्प्याटप्प्याने शिथिल होत असताना करोनाची भीतीही काहीसी ओसरत गेली. चिकनची खरेदीही वाढू लागली. दरही पूर्ववत होऊ लागले. आता किरकोळ बाजारात दीडशे ते २०० रुपये किलोने चिकनचा दर आहे. तर कोंबडी पालन करणाऱ्या व्यावसायिकांकडून गावरान कोंबडी १३० ते १४० रुपये किलोपर्यंत खरेदी केली जाते. बॉयलर कोंबडी ८० ते ९० रुपये किलोपर्यंत मिळत असताना बर्ड फ्लूची चर्चा सुरू झालेली आहे.

महाराष्ट्रात परभणीत शुक्रवारी ८०० कोंबडय़ा मृतावस्थेत आढळल्या. नगरमध्येही असाच एक प्रकार घडल्याचे ऐकण्यात येत आहे. इतरही राज्यात काही ठिकाणी बर्ड फ्लूच्या अनुषंगाने वृत्त पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर मागील दोन दिवसांत मागणीत घट होत आहे, असे शेलूद येथील कोंबडी पालन करणारे व्यावसायिक दिलीप चौधरी यांनी सांगितले.

औरंगाबाद जिल्ह्य़ात लहान-मोठे मिळून एक हजारच्या जवळपास कोंबडय़ांचे पालन करणारे शेतकरी, व्यावसायिक आहेत. आपल्याकडे करोनाकाळात ६ ते ७ टन माल होता. त्याचा काहीही उपयोग झाला नाही. सद्याच्या स्थितीत साधारण २ ते अडीच टन माल जोपासलेला आहे. त्यावर २ ते ३ लाख खर्च झालेला आहे. चिकन विक्रीतील पारंपरिक व्यावसायिकांकडून मागणी कमी झालेली नसली तरी अन्य खरेदीदारांनी ५०० कोंबडय़ा विकत घेण्याची दर्शवलेली तयारी सध्या तरी थांबवलेली आहे. मिळेल त्या दरात माल विक्री करावा लागेल.

– दिलीप चौधरी, व्यावसायिक

खबरदारीच्या सूचना

अन्य राज्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातही खबरदारी घेण्याच्या सूचना आहेत. बर्ड फ्लूचे औरंगाबाद जिल्ह्य़ात एकही उदाहरण आढळलेले नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून तालुका पातळीवर पथक (आरआरटी टीम) तयार केलेले आहे. परभणीत ८०० कोंबडय़ांचा मृत्यू झालेला असून एक-दोन दिवसांत तेथील ठिकाणालाही भेट देण्यात येणार असल्याचे औरंगाबाद येथील पशुचिकित्सालय आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2021 1:07 am

Web Title: bird flu scare hits poultry business zws 70
Next Stories
1 औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्दय़ाभोवती काँग्रेसची खेळी
2 पोलिसाला मारहाण करून लुटले
3 दोनदा कर्जमाफीनंतरही आत्महत्यांची सरासरी वाढतीच
Just Now!
X