विविध क्षेत्रांतील तरुणांकडून औरंगाबाद येथे प्रयोग

औरंगाबाद :  ग्लिरिसिडियामुळे डोंगर हिरवेगार दिसतात पण ना पक्षी घरटी बांधतात ना पशूंची संख्या वाढते. यावर उत्तर शोधत औरंगाबाद शहरातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या दहा-बारा जणांनी मिळून आता दुर्मीळ वृक्षांच्या १२-१५ प्रकारच्या  बियाणांची बँक तयार केली आणि त्यातून दोन हजार रोपे विकसित केली आहेत. पाडळ, मोखा, कौशी, सोनसावर, हुंभ, बिजा अशी नामशेष होणारी झाडे जगण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. औरंगाबाद तालुक्यातील चारठा येथील प्राथमिक शिक्षक मिलिंद गिरधारी, वीज वितरण कंपनीत नोकरी करणारे रोहित ठाकुर, निसर्ग सेवा फाउंडेशनचे प्रवीण मोगरे या मंडळींनी राज्यातील विविध भागातून दुर्मीळ वृक्षाचे जतन व्हावे म्हणून बियाणे गोळा केले आहे. अगदी वनविभागाकडूनही ज्या वृक्ष लागवडीसाठी कानाडोळा होतो ती रोपे आवर्जून विकसित केली जात आहेत.

औरंगाबाद शहरातील सातारा भागात टेकडीवर पहाटे फिरायला जाणाऱ्या काही जणांनी वृक्षारोपण करण्याचे ठरविले. या भागातील पशुपक्ष्यांना पिण्यासाठी पाणी नव्हते. मग डोंगरावर एखादा पाणवठा तयार करण्याची ठरले. यातूनच विविध व्यवसायातील अनेक पर्यावरणप्रेमी एकत्र आले. त्यांनी डोंगरावर ६ हजार ५०० झाडे लावली. ती वाढविलीही. याच काळात प्राथमिक शिक्षक म्हणून काम करणाऱ्या मिलिंद गिरधारी यांनी नामशेष होणारे वृक्ष जपण्याची मोहीम हाती घेतली. डोंगराळ भागात फिरण्याची हौस आणि विदेशी झाडांऐवजी देशी वृक्ष कसे चांगले याची माहिती गोळा करण्याच्या छंदातून पर्यावरणप्रेमींचा गट विकसित होत आहे. पाडळ हा वृक्ष तर फारसा दिसतच नाही. रक्तचंदनासारखे दिसणारे झाड, आकर्षक फुलांची झाडी विकसित झाली तर अन्नसाखळी उभी तयार होईल असे या तरुणांना वाटत आहे. मराठवाड्यात केवळ चार टक्के क्षेत्रावर वन आहे. ते वाढविण्यासाठी दरवर्षी नाना उपक्रम सरकारी पातळीवर होतात. अगदी इको बटालियन देखील कार्यरत आहे. पण देशी वृक्ष वाढीला लागले तरच पर्यावरण टिकेल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. झाडे जोपासणाऱ्यांना रोपवाटिकेतून रोपे दिली जाणार असल्याचे सांगताना महावितरणमध्ये काम करणारे रोहित ठाकुर म्हणाले, ‘अनेक झाडांच्या बिया खाली पडल्यावर आपोआप उगवतात असा समज आहे. पण तसे होत नाही. काही वेळा काही वृक्षांच्या बियाणांच्या उगवणक्षमता वाढविण्यासाठी मानवी श्रमाची गरज आहे. या क्षेत्रात आम्ही काम करतो आहोत.’ रायगड, बुलढाणा, गोंदिया या जिल्ह्यातून एकमेकांना बियाणे पाठविण्यापासून त्याची रोपवाटिका विकसित करण्याचे प्रयत्न होत आहेत.