या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात लातूर येथे रेल्वेबोगी तयार करण्याच्या कारखान्याला मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि अतिशय वेगाने प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या दिशेने पाऊले टाकत ३१ मार्च रोजी लातूर येथे या प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

मराठवाडय़ासारख्या मागास भागात राज्य व केंद्र सरकारने विकासाचे एक नवे दालन सुरू करण्याचा निर्णय घेऊन मागासलेपणाचे बिरुद हटवण्यासाठी उचललेले एक दमदार पाऊल म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जाणार आहे. जे काही करायचे ते वाजवून करायचे या जिद्दीने भाजपाने भूमिपूजन समारंभाच्या निमित्ताने लोकांच्या मनात सरकारसाठी वेगळा कप्पा तयार करावा असे प्रयत्न सुरू केले आहेत. रेल्वेबोगी तयार करण्याचा देशातील चौथा कारखाना लातूर येथे सुरू होत आहे. आजर्पयच्या सरकारने मराठवाडय़ासाठी मोठा उद्योग हाती घेतला नाही. पहिल्यांदाच केंद्र सरकारने हे पाऊल टाकले आहे. मराठवाडय़ाच्या विकासासाठी सरकार किती गंभीर आहे हे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे या दृष्टीने भूमिपूजन समारंभाची तयारी सुरू करण्यात आली आहे.

गेल्या महिनाभरात रेल्वे विभागाने वायुवेगाने काम सुरू केले आहे. राज्य सरकारने रेल्वे विभागाला जे जे सहकार्य हवे आहे ते तात्काळ देऊ केले आहे. जिल्हा क्रीडा संकुलाच्या मदानावर ३१ मार्च रोजी सायंकाळी भूमिपूजनाचा समारंभ थाटामाटात होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वेमंत्री पीयूष गोयल उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी जिल्हय़ातील कार्यकर्त्यांची बठक घेतली व या बठकीत आज जरी गुढीपाडवा असला तरी ३१ मार्च रोजी सरकारने विकासाची गुढी उभारण्याचा संकल्प केला आहे.

भाजपाच्या वतीने एक लाख गुढय़ा तयार केल्या जात असून त्या गुढय़ा प्राधान्याने जिल्हय़ातील सर्व विधानसभा मतदारसंघात घरोघरी दिल्या जाणार आहेत. त्यासोबत पालकमंत्र्यांचे ३१ मार्च रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला येण्याचे निमंत्रणपत्रही जोडले जाणार आहे.

या प्रकल्पामुळे मराठवाडय़ातील स्थलांतर काहीअंशी कमी होण्यास मदत होणार आहे. या भागातील भूमिपुत्रांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. लातूरची ओळख केवळ शैक्षणिक केंद्र म्हणून होती त्याबरोबर आता उद्योगाचे केंद्र अशी नवी ओळख मिळणार आहे. रेल्वे बोगीचा प्रकल्प आल्यानंतर यानिमित्ताने अनेक उद्योग सुरू होतील. शहराचा व परिसराचा चेहरामोहराच बदलणार आहे. रस्ते, रेल्वेच्या जाळय़ामुळे दळणवळणाची मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.

सरकारवर अनेक कारणाने नाराजी असली तरी हा प्रकल्प येत असल्यामुळे सरकारबद्दलचे आशादायी चित्र निर्माण करण्याची संधी सत्ताधाऱ्यांना उपलब्ध झाली आहे. या संधीचे सोने करण्याच्या दृष्टीने भाजपचे कार्यकत्रे कामाला लागले आहेत.

तिखटाची फोडणी काँग्रेसला अन् ठसका शिवसेनेला

लातूर जिल्हय़ाने राज्याला मोठे नेते आजवर दिले. मात्र या मंडळींनी पाहिजे तसा जिल्हय़ाचा विकास केला नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील गेल्या ५० वर्षांत सुटला नाही. हा प्रश्न कायमचा सोडवण्याची दूरदृष्टी दाखवता आली नाही. याउलट साखर कारखाने उभे करून पाण्याची पातळी खोलवर गेली या शब्दात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी टीका केली. वास्तविक ही टीका काँग्रेसला झोंबायला हवी होती मात्र प्रकल्पाची घोषणा झाल्यानंतर विलासराव देशमुखांचे अधुरे स्वप्न त्यांनी देऊ केलेल्या जागेवर पूर्ण होत आहे याचा आम्हाला आनंद असून आम्ही विकासाच्या सोबत आहोत अशी प्रतिक्रिया आ. अमित देशमुख यांनी दिली होती त्यामुळे त्यांनी पालकमंत्र्यांच्या टीकेला उत्तर न देणे पसंत केले मात्र शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अभय साळुंके यांनी पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्र्यांची आश्वासने कशी फसवी आहेत असे सांगत आजवर लातूरच्या विकासात विलासराव देशमुख व शिवराज पाटील चाकूरकर यांचे योगदान कसे विसरता येईल असा प्रतिप्रश्न करत पालकमंत्र्यांवर टीका केली.