अवैध भूखंडविक्री प्रकरणातील आरोपी नगरसेवक राजू तनवणी यांच्या जामिनानंतर त्यांनी सुरू केलेल्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनास भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी रात्री हजेरी लावली. त्यांच्या उपस्थितीमुळे तनवाणी यांना बळ मिळाल्याचे मानले जात आहे. या वेळी कार्यकर्त्यांचा उत्साह लक्षणीय असल्याचा उल्लेख करुन रावसाहेब म्हणाले, एवढा उत्साह आमदार, खासदारांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगीदेखील नसतो. तो येथे एवढा कसा याच्या खोलात नंतर लक्ष घालेन. जाहीर भाषणातील या वाक्यांचे भाजप कार्यकत्रे नवनवे अर्थ लावत आहेत.
शहरातील पहाडसिंगपुरा भागातील भूखंडविक्री प्रकरणात राजू तनवाणी यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त शहरातील गुलमंडी भागात राजू तनवाणी यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी उशिरा झाले. कार्यक्रमास भाजप महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांचीही उपस्थिती होती. शहरातील गुलमंडी हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. महापालिका निवडणुकीत माजी आमदार किशनचंद तनवाणी यांचे बंधू राजू तनवाणी निवडून आले. त्यामुळे शहराचे नाक असणाऱ्या भागातील हा विजय भाजप कार्यकर्त्यांना महत्त्वाचा वाटतो. त्यानंतर पहाडसिंगपुरा प्रकरणातील भूखंड विक्रीमध्ये पोलिसांनी राजू तनवाणी यांना अटक केली. बरेच दिवस त्यांना जामीन मिळाला नाही. जामिन मिळाल्यानंतर त्यांनी संपर्क कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या उद्घाटनास प्रदेशाध्यक्षांनी हजेरी लावल्याने तनवाणी यांना बळ दिल्याचे मानले जात आहे. उद्घाटनप्रसंगी बोलताना रावसाहेब दानवे यांनी महापालिकेकडे व राज्य सरकारकडे निधी नसल्याचे सांगत केंद्राकडून निधी मिळवत शहराच्या विकासासाठी निधी आणल्याचे सांगितले. शुक्रवारी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा कार्यक्रम तब्बल साडेतीन तास उशिरा सुरू झाल्याने तनवाणी यांच्या कार्यालयाचे उद्घाटनही लांबले. मात्र आवर्जून हजेरी लावत दानवे यांनी तनवाणी यांना बळ दिल्याचे मानले जात आहे.