कन्नड-सिल्लोड रस्त्यावरील भराडीजवळ पूल कोसळल्याने सोमवारी दुपारी चारच्या सुमारास चौघेजण गंभीर जखमी झाले. त्यातील दोघाजणांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले, तर उर्वरित दोघांवर सिल्लोड येथे उपचार करण्यात आले. अजय तुकाराम बैनाडे (रा. बोरगाव), बाळू आनंदा पंडित (वय २५, रा. मोढा), गोविंदा तुकाराम पंडित (वय ४५), आरती भारत बारवाल (वय २८) हे चौघे जखमी झाले. या घटनेमुळे पुन्हा एकदा पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.)

दुपारी चारच्या सुमारास दुचाकीवरून जाणाऱ्या चौघांची गाडी अचानकच खाली गेली. त्यामुळे झालेल्या अपघातात हे सर्व जखमी झाले.

सिल्लोड तालुक्यातील भराडी ते सिल्लोड व भराडी ते घाटनांद्रा, बुलढाणा ते अजिंठा, फर्दापूर ते सोयगाव व आळंद ते अंधारी या चार रस्त्यांवरील कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. त्याची गुणवत्ता तपासण्यासाठीच्या चाचण्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कराव्यात. तसेच दुरुस्तीची कार्यवाही तातडीने केली जावी, अशी मागणी आमदार अब्दुल सत्तार यांनी केली आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे तालुक्यातील सर्व धोकादायक पुलांची तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या रस्त्यावरून गणपतीला नेण्यासाठी नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागला.