मराठवाडय़ातील दुष्काळाच्या, प्रामुख्याने लातूर, बीड व उस्मानाबाद जिल्ह्य़ांमधील दुष्काळाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळच शुक्रवारी (दि. ४) येणार आहे.
तिन्ही जिल्हय़ांतील प्रत्येक तालुक्यात एकेक मंत्री जाऊन या तालुक्यातील दुष्काळाची दाहकता समजावून घेणार आहे. पिण्याचे पाणी, चारा, शेतीची उत्पादकता यासह सर्व प्रश्नांचा अभ्यास करून सर्व मंत्री सायंकाळी लातूर येथे येतील. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तिन्ही जिल्हय़ांच्या दुष्काळाबाबत आढावा या बठकीत घेतला जाणार आहे. बीड जिल्हय़ात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह इतर मंत्र्यांचा समावेश आहे, तर उस्मानाबाद जिल्हय़ात पालकमंत्री दीपक सावंत, रामदास कदम यांच्यासह अन्य मंत्री जाणार आहेत. बैठकीत दुष्काळावरील उपाययोजनांवर काही ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विमानाने लातूरला आगमन झाल्यावर ते निलंग्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. निलंगा येथे जलयुक्त शिवार कामाची ते पाहणी करतील. विहीर पुनर्भरण अभियानाचा प्रारंभही त्यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी ६ वाजता सर्व मंत्र्यांची आढावा बठक होईल. रात्री साडेदहा वाजता सर्व मंत्री रेल्वेने मुंबईला रवाना होतील. या साठी रेल्वेला विशेष बोगी जोडली जाणार आहे.
उस्मानाबादेत आजपासून दौरा
उस्मानाबाद –  दुष्काळी संकटांचा सामना करणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातील चारा, पाणी, पीक नुकसान आणि शासकीय योजनांचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या विविध खात्यांचे ४ मंत्री उद्या (गुरुवारी) व शुक्रवारी जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. आढाव्यानंतर चारही मंत्री उपाययोजनांबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना अहवाल देणार आहेत.
मराठवाडय़ातील अन्य जिल्ह्य़ांप्रमाणे उस्मानाबादेतही अवकाळी पावसाने मागील दोन दिवसांत हजेरी लावली. अवकाळी पावसात उमरगा तालुक्यात ५ जनावरे वीज पडून दगावली. उस्मानाबाद तालुक्यातील आळणी, तेर, ढोकी व सारोळा भागातही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसात केळी, द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरूच आहे. कळंब तालुक्यात िपपळगाव, देवधानोरा परिसरात गारपीट झाल्याने राशीसाठी काढून टाकलेली रानावरील ज्वारी आणि कडबा काळा पडला. त्यामुळे हा कडबा जनावरे खात नसल्याची तक्रार शेतकरी करीत आहेत.
पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांना दुष्काळी दौऱ्याच्या निमित्ताने का होईना वेळ मिळाला, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. मंत्री डॉ. सावंत उद्या दुपारी साडेबारा वाजता भूम येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची टंचाई आढावा बठक घेणार आहेत. यानंतर गोळेगाव, वांगी या गावांना भेटी देऊन दुष्काळी पाहणी करतील. उद्योगमंत्री सुभाष देसाई परंडा तालुक्यात दौरा केल्यावर पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेतील.
पर्यावरणमंत्री रामदास कदम हेही रात्री ९ वाजता तुळजापूर मुक्कामी येणार आहेत. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता तुळजाभवानीचे दर्शन घेऊन औसा तालुक्यातील उजनीस रवाना होतील. तत्पूर्वी तुळजापूरमध्येही दुष्काळाबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेणार आहेत. शिक्षणमंत्री विनोद तावडे हे शुक्रवारी पहाटे उस्मानाबादला येणार आहेत. सकाळी ८ वाजता तालुक्यातील काही दुष्काळग्रस्त गावांना ते भेटी देतील. दुष्काळी स्थितीचा आढावा घेऊन दुपारी साडेतीनला लातूरकडे रवाना होतील.