शासनाच्या वतीने शेतमाल हमीभावाची घोषणा केली जात असली, तरी प्रत्यक्षात कोणताच माल हमीभावाने विकला जात नाही, असे चित्र बाजारपेठेत दिसत आहे. मागील आठवडय़ात एकमेव हरभऱ्याची विक्री हमीभावापेक्षा अधिक भावाने होत होती. या आठवडय़ात हरभऱ्याच्या भावातही घसरण झाली असून ४ हजार ३०० रुपये िक्वटलने विकला जाणारा हरभरा मंगळवारी ३ हजार ७५० रुपयाने विकला गेला अन् बाजारपेठेतला शेतकरी हवालदिल झाला.

सोयाबीनचे भाव पडल्याने केंद्र सरकारने पहिल्यांदाच बारा वर्षांनंतर आयातीवर शुल्क आकारले. सोयाबीन पेंड निर्यातील प्रोत्साहन अनुदान दिले. अशा निर्णयामुळे सोयाबीनचा हमीभाव ३ हजार ५० होता व पूर्वी २ हजार ४०० रुपये क्विंटलने विकले जाणारे सोयाबीन आता २ हजार ९५० रुपये िक्वटलने विकले जात आहे. हमीभावापेक्षा अजूनही ते कमी भावाने विकले जात असले, तरी कदाचित हमीभावापपर्यंत सोयाबीन झेप घेईल, अशी बाजारपेठेत अपेक्षा आहे.

तुरीचा गतवर्षीचा हमीभाव ५ हजार ५० रुपये होता. गेले वर्षभर तुरी १ हजार रुपये कमी भावानेच विकल्या गेल्या. आता नवीन येणाऱ्या तुरीसाठी ५ हजार ४५० रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. मंगळवारी लातूर बाजारपेठेत तुरीची सुमारे १ हजार क्विंटल आवक होती व भाव ४ हजार १०० ते ४ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल होता. तब्बल १ हजार २०० रुपयाने हमीभावापेक्षा कमी भावाने तूर विकली जात आहे. तुरीचे या वर्षी विक्रमी पीक आहे व वातावरण तुरीला अनुकूल असल्यामुळे उत्पन्न अधिक होईल, असा अंदाज आहे. मूग, उडीद व तूर याच्या आयातीवर काही प्रमाणात शासनाने र्निबध लादले असले, तरी त्याचा बाजारपेठेत भाव वाढण्यास फारसा परिणाम होत असल्याचे दिसत नाही.

हरभरा व मसूर या दोन्ही वाणासाठी आयातीवर कोणतेही बंधन सरकारने लावलेले नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलिया व अन्य देशातील हरभरा मोठय़ा प्रमाणावर आयात होतो आहे. हरभऱ्याचा हमीभाव ४ हजार २५० रुपये आहे. गतवर्षीचा शिल्लक हरभराच प्रचंड प्रमाणावर आहे.

जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ापासून नवीन हरभरा बाजारपेठेत येईल. या वर्षी हरभऱ्याचा पेरा देशभरातच किमान २५ टक्के अधिक असल्याचा अंदाज व्यक्त होतो आहे व सर्वच ठिकाणी हरभऱ्याच्या वाढीसाठी वातावरण अनुकूल असल्यामुळे हरभऱ्याचे उत्पन्नही मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे. देशांतर्गत उत्पादन वाढल्यानंतर जर आयातीवर बंधन आणले नाही, तर देशांतर्गत मालाचे भाव पडतात त्यामुळे ४ हजार २५० हमीभाव असला, तरी नव्या हरभऱ्याला ३ हजार ५०० रुपयांपेक्षा कमी भाव बाजारपेठेत मिळेल. केंद्र शासनाने तातडीने हरभरा व मसुरीच्या आयातीवर बंधन लादण्याचा निर्णय घेण्याची गरज आहे, तरच देशातील शेतकरी वाचेल.

बाजारपेठेतील चित्र बदलण्यासाठी शासनाने तातडीने हरभरा भावातील घसरण थांबवण्यासाठी आयात बंदीचा निर्णय घेतला पाहिजे

हुकूमचंद कलंत्री, अध्यक्ष, लातूर दालमिल असोसिएशन.