केंद्र सरकारला ‘निजामाचा बाप’ अशी उपमा देत शिवसेनेचे उपनेते खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेनंतर गुरुवारी पर्यावरणमंत्री तथा पालकमंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्री फडणवीस दूरदर्शी नेते असल्याचे सांगत कालच्या टीकेवर पांघरूण घातले. राऊत यांनी केलेली टीका केंद्र सरकारच्या अनुषंगाने होती. त्यांनी तशी टीका का केली, हे त्यांना विचारा. मात्र, राज्यातील जलयुक्त शिवार ही चांगली योजना असून मुख्यमंत्री फडणवीस दूरदर्शी नेते आहेत, असे वक्तव्य कदम यांनी केले. जे चांगले त्याला चांगले म्हणणे चूक कसे ठरू शकेल, असा प्रश्न करीत राऊत यांच्या केंद्रावरील टीकेबाबत अधिक बोलणे त्यांनी टाळले.
औरंगाबाद जिल्ह्य़ातील १ हजार ४०० शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करण्यासाठी आयोजित विशेष कार्यक्रमासाठी कदम आले होते. केंद्रातल्या सरकारवर केलेल्या थेट टीकेनंतर राज्यात मात्र आलबेल असल्याचे कदम यांनी सांगितले. बियाणे वाटपाच्या जाहीर कार्यक्रमात शिवसेनेने केलेल्या शिवजलक्रांती योजनेतून किती काम झाले, याची माहिती कार्यक्रमास उपस्थित असणारे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना कदम यांनी दिली.