News Flash

सिल्लोड पालिकेवर काँग्रेसचे वर्चस्व

नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या राजश्री निकम विजयी

सिल्लोड पालिकेवर काँग्रेसचे वर्चस्व
(संग्रहित छायाचित्र)

नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या राजश्री निकम विजयी

औरंगाबाद : सिल्लोड नगरपालिकेवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांचे पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले असून नगराध्यक्षपदासह २६ पैकी तब्बल २४ नगरसेवक हे काँग्रेसचे विजयी झाले आहेत. त्यात सत्तार यांच्या पत्नी आणि मुलाचाही समावेश आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पूर्ण ताकद लावूनही सिल्लोडमध्ये भाजपचे केवळ दोनच नगरसेवक निवडून येऊ शकले. या निवडणुकीत आमदार अब्दुल सत्तार यांनीही आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती.

जनतेतून निवडून द्यावयाचे नगराध्यक्षपद यावेळी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव होते. या पदासाठी काँग्रेसकडून राजश्री राजरत्न निकम या उभ्या होत्या. त्यांनी भाजपचे अशोक अभिमान तायडे यांचा तब्बल १० हजार ८८२ मतांनी पराभव केला. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे विनोद पगारे, एमआयएमकडून प्रभाकर पगारे, बसपाचे राजू रोजेकर, आम आदमी पार्टीचे आनंद शेळके व अपक्ष अनिल साबळे, अशोक सोनवणे हेही रिंगणात होते. मात्र खरी लढत झाली ती भाजपचे अशोक तायडे व काँग्रेसच्या राजश्री निकम यांच्यात. यात राजश्री निकम या विजयी झाल्या. तर १३ प्रभागातून निवडून द्यावयाच्या २६ नगरसेवकांपैकी तब्बल २४ नगरसेवक हे काँग्रेसचे निवडून आले. त्यात आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफीसा बेगम अब्दुल सत्तार व मुलगा तथा नगराध्यक्षपदी राहिलेले समीर सत्तार यांचा समावेश आहे.

सिल्लोड नगरपालिकेसाठी बुधवारी मतदान घेण्यात आले. ४४ हजार ९८३ मतदारांपैकी ७१ टक्के मतदारांनी हक्क बजावला. गुरुवारी सकाळी मतमोजणीला प्रारंभ झाला. दुपापर्यंत सर्व निकाल हाती आले. काँग्रेसचा विजय निश्चित होणार, असा अंदाज बांधला गेला होता. या निवडणुकीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. सिल्लोड नगरपालिकेवर आमदार अब्दुल सत्तार यांचे मागील २० वर्षांपेक्षा अधिक काळापासून वर्चस्व आहे. ते पुन्हा एकदा सिद्ध झाले.

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे व आमदार सत्तार यांच्यातील मतभेद अलीकडे टोकाला गेल्याच्या पाश्र्वभूमीवर आमदार सत्तार यांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी यावेळी भाजपकडूनही तयारी करण्यात आली होती.

सिल्लोडपासून जवळच भोकरदन हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे गाव आहे. शिवाय सिल्लोड हे जालना लोकसभा मतदारसंघात येत असल्यामुळे रावसाहेब दानवे यांनीही नगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी जोर लावला होता. तसेच सिल्लोड हे मराठवाडा-खान्देशच्या सीमेवर असल्यामुळे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनीही या निवडणुकीत लक्ष घातले होते. मात्र आमदार सत्तार यांचे वर्चस्व कायम असल्याचे काँग्रेसने मिळवलेल्या विजयातून स्पष्ट झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2019 2:52 am

Web Title: congress clean victory in sillod nagar parishad election
Next Stories
1 विमान प्राधिकरणात नोकरीचे आमिष, टोळी अटकेत
2 दुधासाठीचे अनुदान बंद; उत्पादक शेतकऱ्यांना फटका
3 ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’:औरंगाबादमध्ये आज प्राथमिक फेरी रंगणार
Just Now!
X