चिकित्सा क्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशास मुभा

औरंगाबाद:  प्राणवायूची कमतरता, न मिळणारी औषधे, याचबरोबर कोवीड काळात अतिदक्षता विभागातील व्यवस्थापन अधिक किचकट बनले. आरोग्य क्षेत्रात गेल्या वर्ष- दीडवर्षापासून झालेले बदल आणि त्यावर मात करण्यासाठी घ्यावयाची काळजी या विषयावर डॉक्टरांसाठी स्वतंत्र सहा महिन्याचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (घाटी) अधिष्ठाता कानन येळीकर यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांकडे केला आहे. ‘कोविड प्रतिबंधात्मक उपाय आणि व्यवस्थापन’ असे या अभ्यासक्रमाचे नाव असावे, असे प्रस्तावित करत अतिदक्षता विभागात मनुष्यबळ वाढविण्यासाठी याचा उपयोग होईल असे प्रस्तावित करण्यात आले आहे.  औरंगाबाद येथील घाटी रुग्णालय तिसऱ्या लाटेसाठी खाटांची संख्या एक हजारपर्यंत वाढविण्याची तयारी करत असून गंभीर रुग्णांवर उपचार करताना येणारा अनुभव लक्षात घेता अशा प्रकारच्या प्रमाणपत्र अभ्याक्रमाची गरज असल्याचे त्यांनी प्रस्तावात म्हटले आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे डॉ. कैलास चव्हाण यांनीही असा प्रस्ताव आला असून असे अभ्यासक्रमातील बदल वारंवार होत असतात आणि ते केले जातील, असे ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

कोवीडकाळात औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात गंभीर रुग्णांवर उपचार करण्यात आले. विविध प्रकारे मार्गदर्शक तत्त्वांनुसार केले जाणारे उपचार आणि अतिदक्षता विभागात घ्यावयाची काळजी हा प्रकार दैनंदिन व्यवहारातून डॉक्टर शिकले. पण त्याचा स्वतंत्र अभ्यासक्रम केल्यास येत्या काळात तज्ज्ञ मनुष्यबळ उपलबध होणार आहे. एम.बी.बी.एस, बी.ए. एम. एस, बी.एचएमएस, दंत चिकित्सक यां सर्वांना या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याची मुभा असावी. यामध्ये वैद्यकीय क्षेत्राच्या अंगाने  सूक्ष्म जीवशास्त्र आणि  रुग्णालय स्वच्छता,  साथरोग आणि संसर्ग रोखण्याचे मार्ग आदी विषय शिकविले जावेत. औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हा पूर्णवेळ अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पुरेशी यंत्रसामुग्री असून  संलग्नता शुल्क म्हणून ४० हजार रुपये आणि  संस्था शुल्क ५० हजार रुपयापर्यंत शुल्क आकारणीस परवानी मागण्यात आली आहे. घाटी रुग्णालयात यासाठी चाचणी यंत्रणेसह विविध प्रकारची यंत्रसामुग्री असल्याचेही प्रस्तावात म्हटले आहे.

गेल्या वर्षभरातील अनुभव लक्षात घेता तज्ज्ञ मनुष्यबळाची कमतरता सर्वत्र जाणवत आहे. सर्व प्रकारच्या चिकित्सा क्षेत्रातील पदवीधर वैद्यकीय विद्याथ्र्यास  नवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध करून दिल्यास हे मनुष्यबळ वाढेल असा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय