शेततळी भरली, हिरवाई आली

सुहास सरदेशमुख, औरंगाबाद</strong>

मराठवाडा सततचा दुष्काळी. अगदी ऑक्टोबरच्या सुरुवातीलादेखील अनेक धरणांमध्ये पाणी नव्हते. पण ऑक्टोबरमध्ये सरासरीच्या ३३७ टक्के पाऊस अधिक झाला आणि मराठवाडय़ातील धरणांमध्ये पाणी आले. काही धरणे भरली. पण औरंगाबाद आणि जालना जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना आनंद झाला तो शेततळी भरल्याचा. मराठवाडय़ात तब्बल ४७ हजार १४१ शेततळी सरकारच्या अनुदानातून बांधली गेली खरी, पण त्यात पाणीच नव्हते. नोव्हेंबरच्या पहिल्या तारखेला बहुतांश सर्व शेततळी भरली आहेत आणि मराठवाडाही हिरवाईने नटला आहे. अर्थात या हिरवाईला पिकांच्या नुकसानीची एक वाईट किनार आहे. पण पाणी आले, चांगले झाले अशीच भावना सर्वत्र आहे.

भाजप सरकारवर शेतकरी नाराज असल्याचे चित्र दिसून येत होते. या काळात ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेची घोषणा झाली. बरेच दिवस त्याचा शासन निर्णय काय निघाला नाही. त्यावरूनही टीका झाली. ५० हजार रुपयांत शेततळे होऊ शकते काय, असे प्रश्नही विचारले गेले. मात्र, औरंगाबाद जिल्ह्य़ातील वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आणि औरंगाबाद जिल्ह्य़ात १३ हजार ३९१ शेततळी तयार करण्यात आली. वर्षभराचा कालावधी उलटला तरी त्यात पाणी काही येत नव्हते. गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला. अधिकाऱ्यांनी एक-एक गाव दत्तक घेतले. विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त विजय फड यांनी एक गाव दत्तक घेतले आणि गावात पहिल्या टप्प्यात ५० शेततळी केली. आता ही सगळीच शेततळी भरली आहेत.

अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले असले, तरी पाणी हातात असल्यामुळे खरिपाचा नाही तर नाही, रब्बीचा हंगाम अधिक चांगला जाईल, असे शेतकरी सांगतात. मराठवाडय़ात केवळ एका योजनेतून शेततळी झाली नाही तर राष्ट्रीय फळबाग कार्यक्रमातूनही प्लास्टिकसह शेततळी घेण्यात आली. त्याचा परिणाम रब्बीत दिसून येईल, असे सांगण्यात येते.

४७ हजार १४१ शेततळी भरली :  ३९ हजार ६०० शेततळी करण्याचे उद्दिष्ट आखण्यात आले होते. आता ४७ हजार १४१ शेततळी पूर्ण झाली आहेत. ही सगळी शेततळी पाण्याने काठोकाठ भरली आहेत. जेव्हा पिकांना पाण्याची गरज असते, तेव्हा शेततळ्यातील पाणी वापरता यावे, असे अपेक्षित आहे. विहीर जेव्हा काठोकाठ भरलेली असते, तेव्हा त्यातील काही पाणी शेततळ्यात घ्यावे आणि संरक्षित सिंचन म्हणून त्याचा वापर करावा, अशी योजना होती. ती तीन वर्षांनंतर कार्यान्वित होणार आहे.