04 August 2020

News Flash

शंकररावांवर मरण ओढविणारे धरण..!

पैठणजवळील जायकवाडी धरणाचे जनक, माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण धरणाच्या परिसरात संत ज्ञानेश्वर उद्यानात उद्या (शुक्रवारी) होत आहे.

पैठणजवळील जायकवाडी धरणाचे जनक, माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण धरणाच्या  परिसरात संत ज्ञानेश्वर उद्यानात उद्या (शुक्रवारी) होत आहे. मराठवाडय़ातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील हे धरण साकारताना शंकररावांना मोठा संघर्ष करावा लागला. इतकेच नव्हे, तर मरण ओढवून घेणारा प्रसंगही त्यांच्यावर आला होता..!
शंकररावांची प्रदीर्घ जीवनयात्रा २००४ मध्ये थांबली. त्यानंतर तब्बल ११ वर्षांनी त्यांच्या पुतळ्याचे अनावरण निश्चित करून फडणवीस सरकार पूर्वीच्या आघाडी सरकारचे अर्धवट राहिलेले एक काम पूर्णत्वास नेत आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाचारण न करताना जलसंपदा मंत्र्यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण केले जात असून निमंत्रणपत्रिकेत भाजप-शिवसेनेतील सर्व संबंधितांची नावे शिष्टाचारानुसार छापण्यात आली आहेत.
या कार्यक्रमानिमित्त मराठवाडय़ाच्या हक्काचे पाणी, जायकवाडीला वरच्या भागातील वर्चस्ववादी राजकारणाचा बसलेला फटका आदी विषय ऐरणीवर आले असतानाच या धरणासाठी झालेली संघर्षयात्रा समोर आली आहे. धरणाच्या त्या काळातील विरोधकांनी शंकररावांना संपविण्याचाच अयशस्वी प्रयत्न केला होता, अशी खूप जुनी माहितीही समोर आली आहे.
जायकवाडीवरू न झालेल्या आरोपांना शंकररावांनी त्या-त्या वेळी प्रत्युत्तर दिले. वेगवेगळे आक्षेपही सप्रमाण खोडून काढले. पण १९९० नंतर स. मा. गर्गे, सुधीर भोंगळे प्रभृतींना दिलेल्या मुलाखतींमध्ये त्यांनी आणखी काही बाबी उघड केल्या. जायकवाडीला चव्हाण यांनी केंद्राकडून आणलेली मंजुरी त्यावेळच्या प्रस्थापितांना रुचली नव्हती. शंकररावांनी थेट कोणाचे नाव घेतले नाही; पण बडय़ा मंडळींना धरण मंजुरीचा आनंद झाला नाही, असे त्यांनी स. मा. गर्गे यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. भोंगळे यांना १९९५नंतर दिलेल्या वेगवेगळ्या मुलाखतींतूनही शंकररावांनी जायकवाडीसंदर्भातील काही बाबी स्पष्ट केल्या.
त्या काळातील एका जीवघेण्या प्रसंगाबद्दल त्यांनी गर्गे यांच्याकडे कोणताही उल्लेख केला नाही. पण राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या ‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ या चरित्र मालिकेत शंकररावांचे छोटेखानी चरित्र प्रकाशित झाले. त्यात शंकररावांवर ओढवलेल्या ‘त्या’ प्रसंगाचा उल्लेख लेखक डॉ. सुरेश सावंत यांनी केला आहे. हाती घेतलेला प्रकल्प पूर्ण करत असताना हौतात्म्य पत्करावे लागले तरी बेहत्तर, पण जायकवाडीची योजना सोडणार नाही, असा निर्धार शंकररावांनी केला होता. प्रकल्पाच्या विरोधकांकडून शंकररावांचे बरे-वाईट होणार, अशी गुप्त बातमी तेव्हा खालच्या आवाजात चर्चिली जात होती. त्या काळात शेवगाव येथे मोटारीतून एका कार्यक्रमास जात असताना एका डोंगराच्या पायथ्यापासून जाणाऱ्या रस्त्यावर डोंगरावरून एकापाठोपाठ एक अजस्त्र दगड गडगडत खाली आले. ते दगड शंकररावांच्या गाडीवर पडावेत, असाच तो कट होता. पण ‘जाको राखे साईयाँ, मार सखे ना कोय!’ असे घडले. शंकररावांची गाडी काही फूट पुढे गेली, मग दगड रस्त्यावर आदळले. या जीवघेण्या प्रसंगानंतरही शंकरराव डगमगले नाहीत वा विचलित झाले नाहीत. नियोजित कार्यक्रमाला ते वेळेवर उपस्थित झाले..
जायकवाडी धरणाचे उद्घाटन १९७६ मध्ये झाले. त्याच्या ११ वर्षे आधी तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या हस्ते १८ ऑक्टोबर १९६५ रोजी धरण कामाचा शुभारंभ झाला. त्या प्रसंगाला रविवारी (दि. १८) ५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर या धरणाच्या जनकाचा पुतळा येथे उभा राहतो आहे, ही बाब आनंददायी असल्याची भावना आमदार अमरनाथ राजूरकर यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2015 1:40 am

Web Title: death dam shankarrao chavan
टॅग Dam,Jayakwadi
Next Stories
1 ‘कोयता बंद’मुळे मजुरांचीच कोंडी!
2 दुष्काळात परीक्षा शुल्क भरता न आल्याने कळंबचे ४१० विद्यार्थी परीक्षेपासून वंचित!
3 ‘पांढरे सोने’ काळवंडणार!
Just Now!
X