भावाच्या मृत्यूची माहिती मिळताच एका व्यक्तीच्या दोन भावांनी खुनाचा संशय घेत अंत्यसंस्कार थांबवले. नारेगाव परिसरातील हर्सूल येथे राहणार्‍या एका कुटुंबात ही घटना घडली. पोलिसांनी परिस्थितीचा अंदाज घेत संशयावरुन मयताची पत्नी, मुलगा आणि जावायाला ताब्यात घेतले. संध्याकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यावर पुढील कारवाई होईल अशी माहिती एम.आय.डी.सी. पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी सांगितले. शेख मंजूर शेख महेमूद (५०) रा.नारेगाव असे मयताचे नाव आहे.

शे.मंजूर यांना चार बायका आहेत. नारेगाव येथील पत्नीकडे शे.मंजूर यांचा मृत्यू झाल्याची माहिती मयताच्या पत्नीने मंजूर यांचे भाऊ शे.जफर आणि शे.मुख्तार यांना दिली. पण ते येण्यापूर्वीच अंत्यसंस्काराचे सामान आणले गेल्यामुळे जफर आणि मुख्तार यांना मंजूरच्या खुनाचा संशय आला. त्यांनी एम.आय.डी.सी. सिडको पोलिसांशी संपर्क साधून मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची मागणी केली. त्यामुळे पोलिस निरीक्षक माळाळे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तीन जण ताब्यात घेत मंजूरचा मृतदेह घाटी रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठवला असून याबाबत पुढील तपास सुरु आहे.