राज्यावर दुष्काळाचे भीषण संकट आहे. त्याला धर्याने सामोरे जायला हवे. सरकार तुमचे आहे. दुष्काळावर मात करण्यास वाट्टेल तेवढे कर्ज काढू. मात्र, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू. शेतीतील गुंतवणूक पाचपटींनी वाढवली व कृषिपूरक उद्योग उभारले तरच शेतकरी जगेल याची सरकारला जाण आहे. फक्त तुम्ही धर्याने उभे राहा, असा दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी निलंगा तालुक्यातील लांबोटा गावात जलयुक्त शिवारच्या कामाची पाहणी केली. यानंतर विहीर पुनर्भरण योजनेचा प्रारंभ त्यांनी केला. महसूलमंत्री एकनाथ खडसे, खासदार सुनील गायकवाड, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, मुख्य सचिव स्वाधीन क्षेत्रीय, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट आदी या वेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत आहे. त्यासाठी प्रचंड पसे खर्च केले जात आहेत. या योजना गावपातळीवर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहेत ना, त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळतो आहे ना, याचा आढावा घेण्यासाठी एकाच दिवशी ३० मंत्री ३० तालुक्यांत दाखल झाले आहेत. सलग दुसऱ्या वर्षी दुष्काळाची अवकृपा सहन करावी लागत आहे. खरीप व रब्बी दोन्ही पिके हातची गेली. प्यायला पाणी नाही. अनेक अडचणी आहेत. त्यावर मात करण्यासाठी सरकार आपल्या पाठीशी आहे. ही आपत्ती केवळ नसíगक नाही तर मानवनिर्मित आहे.
पूर्वीच्या काळी निसर्गातील साधनसंपत्तीचा केवळ उपभोग घेतला गेला. परत निसर्गाला काही दिले गेले नाही. जलयुक्त शिवार योजनेमार्फत पाण्याचे विकेंद्रित साठे तयार केले आहेत. त्याचा लाभ लोकांना होत आहे. तीन वष्रे ही योजना राबवली, तर निम्मे राज्य दुष्काळमुक्त होईल व ५ वष्रे राबवली तर संपूर्ण राज्य दुष्काळमुक्त होईल. आपले सरकार दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न घेऊन काम करीत आहे. शाश्वत सिंचनासाठी पसा कमी पडू दिला जाणार नाही. पाणी व वीज उपलब्ध झाली, तर शेतकरी चमत्कार करू शकतो हे सर्वानाच माहिती आहे. आपल्या सरकारने एक लाख शेतकऱ्यांना नव्याने वीजजोडणी दिली. मागेल त्याला शेततळे योजनेचा लाभ मोठय़ा प्रमाणावर शेतकरी घेत आहेत. २४ हजार शेतकऱ्यांनी ३ दिवसांत या साठी अर्ज केले आहेत.
मागील दौऱ्यात निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या चच्रेतून मागेल त्याला शेततळय़ाची संकल्पना उभी राहिली. मध्य प्रदेशात ३ लाख शेततळी घेतली गेली व तेथील विकासाचा दर २४ टक्के आहे. राज्यात ५ लाख शेततळी घेण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेसाठी तरतूद केली आहे. मनरेगाअंतर्गत शेततळी योजनाही सुरू आहे. दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे ४० कोटी रुपयांचे शुल्क माफ केले. मनरेगाअंतर्गत १० कोटी मनुष्य दिवस काम देण्याची तयारी केली आहे. राज्यात रोजगार हमी योजनेवर ५ लाख मजूर काम करीत आहेत. मागेल त्याला काम देण्याची तयारी सरकारने केली आहे. उन्हाळय़ात पिण्याच्या पाण्याच्या टँकरसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. एकही जनावर चाऱ्याविना राहणार नाही याची काळजी घेतली जाईल. ऑक्टोबरमध्येच चारा छावण्या सुरू करण्यात आल्या, राज्याच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडल्याचा दावा त्यांनी केला.
गेल्या दोन वर्षांत दुष्काळ निवारणासाठी १८ हजार कोटींचे नियोजन करण्यात आले. दुष्काळाचे संकट मोठे आहे. विम्याचा हप्ता भरला नाही अशा शेतकऱ्यांनाही ५० टक्के पसे देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आगामी खरिपात पेरणीसाठी खते, बियाणे उपलब्ध केले जाईल. कर्जाचे पुनर्गठन केले जाणार आहे. महिला बचतगटासाठी शून्य टक्के व्याजदराने कर्ज दिले जाणार आहे. देशात केवळ महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना नियमित धान्य देण्याची योजना सुरू केली. सात लाख शेतकरी कुटुंबांना याचा लाभ मिळत आहे. एकही शेतकरी लाभापासून वंचित असल्यास संबंधित स्वस्त धान्य दुकानदारावर फौजदारी खटले दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत १० जिल्हय़ांत महाशिबिरे घेऊन, मुंबई-पुण्यातून तज्ज्ञ डॉक्टरांना आणून उपचार केले जाणार आहेत. एकही शेतकरी उपचाराविना वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले आहेत. शेतीपूरक उद्योगात मोठी गुंतवणूक वाढवली जाईल. टेक्सटाइल व सोयाबीन पार्क उभे केले जाणार असल्याचेही ते म्हणाले. सरकार तुमच्या पाठीशी आहे, योजनेत काही चुका असतील तर त्या दुरुस्त करू. मात्र, दुष्काळाचा सामना मजबुतीने करण्यासाठी तुमच्या पाठीशी राहू, असा विश्वास त्यांनी दिला.
महसूलमंत्री खडसे यांनी, राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी तिजोरी खाली केली आहे. सरकारने सुरू केलेल्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन केले.
कीर्तनकारांची ५१ हजारांची मदत
जलयुक्त शिवार योजनेसाठी कीर्तनकार संघटनेच्या वतीने त्यांना मिळणाऱ्या मानधनातील १० टक्के रक्कम देण्याचा निर्णय घेऊन ५१ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत उपचारातून आपल्या नातवाचे प्राण वाचले, म्हणून एका आजीने मुख्यमंत्र्यांची दृष्ट काढली. माकणी येथील मधुकर माकणीकर, वळसंगी येथील गोिवदराव पाटील, कोराळीच्या सरपंच कल्पना गायकवाड यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे मांडले.