केंद्र सरकारनं नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. त्या घोषणेची आज वर्षपूर्ती झाली. वर्षभरात सर्वसामान्य नागरिकांचे, तसेच छोटे व्यापारी यांचे हाल झाले. मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय चुकला असून त्यामधून काळा पैसा बाहेर आला नाही. उलट चलनात त्याचा समावेश झाला, असे मुद्दे उपस्थित करुन नोटबंदीच्या निर्णयाविरुद्ध काँग्रेसकडून देशभरात ८ नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून साजरा केला जात आहे. औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने मुंडण आंदोलन करून सरकारच्या निर्णयाचा निषेध नोंदवण्यात आला.

८ नोव्हेंबर २०१६ या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० आणि १००० रुपयाच्या नोटा चलनातून बाद झाल्याची घोषणा केली होती. यावेळी काळा पैसा, नक्षलवाद, दहशतवाद आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलं. मात्र, वर्षभरानंतरही यापैकी कोणत्याही गोष्टींवर आळा बसलेला नाही. उलट या निर्णयामुळे शेतकरी, छोटे व्यापारी यांचं नुकसान झालं. तसेच विकासदरही ढासळल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदी केली. मात्र, नोटाबंदीमुळे काळा पैसा चलनात आला. औरंगाबादमध्ये काँग्रेसच्या आजी-माजी आमदारांनी मुंडण करत निषेध नोंदवला. आमदार अब्दुल सत्तार, सुभाष झाम्बड, माजी आमदार कल्याण काळे यांनी मुंडण करून भाजपा सरकारचा निषेध केला.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने देखील नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध नोंदवण्यात आला. त्यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचं श्राद्ध घालत सरकारचा निर्णय चुकीचा असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांच्या प्रतिमेला श्रद्धांजली देखील वाहिली.