औरंगाबाद जिल्हा सध्या भीषण दुष्काळाच्या गर्तेत सापडला असून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण फिरावे लागत आहे. जिल्ह्यातील एकुणच दुष्काळी स्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी आढावा घेतला. यामध्ये प्रामुख्याने पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी चारा उपलब्धता या दोन मुद्दे सरपंचांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडले.

जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा आणि पाचशेहून अधिक सरपंचांशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारी ऑडियो कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून दुष्काळ, टंचाई आणि उपाययोजनांबाबत आढावा घेतला. कॉन्फरन्स कॉलमध्ये जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार आणि ग्रामसेवक, तलाठ्यांसह सरपंचांशी एकाच वेळी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. प्रथम मुख्यमंत्र्यांनी दुष्काळासंदर्भात आपले निवदन केले व त्यानंतर सरपंच तसेच इतरांना बोलण्याची संधी मिळाली. तब्बल दीड तासांच्या या ऑडियो कॉन्फरन्समध्ये औरंगाबाद, सोयगाव, गंगापूर, पैठण, सिल्लोड, वैजापूर, खुलताबाद, कन्नड व फुलंब्री तालुक्याचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांना बोलताना सरपंचांनी टँकरने पाणीपुरवठ्याची मागणी केली असता ते उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी केल्या. अशा प्रकरणात तहसीलदारांनी तत्काळ चौकशी करुन अहवाल देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी पाणीपुरवठ्याकडे गांभिर्याने लक्ष देण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी या कॉन्फरन्समधून प्रशासकीय यंत्रणेला दिल्या. उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बाणापुरे यांच्या दालनात तहसिलदार रमेश मुंडलोड, सतीश सोनी यांच्यासह अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व ठिकाणांहून सुरू असलेल्या संवादाची माहिती घेतली जात होती. या कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठी सर्वांचे मोबाईल क्रमांक संकलित करण्यात आले होते. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन समस्या जाणुन घेण्याचा हा प्रयत्न होता.