निवडणूक लढवताना नामांकन पत्रासोबत सादर केलेल्या शपथपत्रात खोटी, चुकीची व दिशाभूल करणारी माहिती नमूद केल्याप्रकरणात बीड लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गुरुवारी सादर करण्यात आली आहे.

या संदर्भात बीड लोकसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवार कालिदास आपेट यांनी अ‍ॅड. अजित काळे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. निवडणूक आयोगाच्या लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ च्या कलम १२५-अ नुसार खोटी माहिती सादर करणे हा गुन्हा असून त्या अंतर्गत ही याचिका दाखल करण्यात आली.

याचिकेत प्रीतम मुंडेंकडून शपथपत्रात सादर केलेल्या माहितीवरून एकूण सहा आक्षेप घेण्यात आले आहेत. प्रीतम मुंडे यांचे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील ५५ व्या मतदार यादीतील ११४० क्रमांकावर मतदार म्हणून नाव आहे. याशिवाय प्रीतम मुंडे यांचे परळी विधानसभा मतदारसंघामध्येही मतदारांच्या नावातील यादीत ४१ मध्ये ५८५ क्रमांकावर नाव आहे. एकाच मतदाराचे दोन मतदारसंघात नाव असू नये, हा नियम आहे. तसेच प्रीतम मुंडे यांचे कागदोपत्री व्यवहार हे प्रीतम गौरव खाडे या नावाने चालतात.  त्याच नावाने त्या एका कंपनीच्या संचालिका असून त्याची माहिती व कंपनीचा परवाना निलंबित केलेला असल्याची माहितीही प्रीतम मुंडे यांनी शपथपत्रात नमूद केलेली नाही. प्रीतम मुंडे यांनी मतदारांना भावनिक मुद्यांच्या आधारे आकर्षति करण्यासाठी वडील गोपीनाथराव मुंडे यांचे नाव लावले आहे. प्रीतम मुंडे या वैद्यनाथ अर्बन  को-ऑप. बँकेच्या संचालक असून त्यांच्या विरोधात कोटय़वधींचे बोगस कर्ज वाटप केल्याप्रकरणी परळी वैजनाथ येथील पोलीस ठाण्यात फसवणुकीसह इतर कलमांखाली गुन्हा दाखल आहे. त्याचीही माहिती मुंडे यांनी सादर केलेली नाही, असाही आक्षेप याचिकेत घेण्यात आला आहे.