आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा उपक्रम

औरंगाबादच्या शहागंज भागातील एका कापड दुकानात ४० मुला-मुलींपैकी  निशांत काळेच्या कपडय़ाचे माप घेतले जात होते. अंगकाठीनं किरकोळ असणाऱ्या निशांतचे डोळे आनंदाने चमकत होते. नव्या कपडय़ाच्या त्या ‘अद्भुत’ स्पर्शाची जादू अनुभवत तो सांगत होता, ‘मी चौथीत शिकतो. वडील केव्हा गेले काय माहीत?’..

निशांत नंदुरबार जिल्ह्य़ातल्या बुडिंगगव्हाणचा. तेथे त्याच्या वडिलांची शेती होती. त्या शेतीतून पिकले ते कर्जच. त्याने त्याच्या वडिलांचा घास घेतला. ते वारल्यानंतर गावच्या सरपंचाने त्याला नाशिक जिल्ह्य़ातल्या एका आश्रमशाळेत नेऊन सोडले. आता तो मित्रांबरोबर पथनाटय़ करतो. त्यातून संदेश देतो – ‘आमचे आई-वडील सोडून गेले आणि आम्ही पोरके झालो. आईपासून दूर एका आश्रमशाळेत शिकतो. तुमच्या मुलाबाळांची परवड होऊ होऊ नये असं वाटत असेल तर आत्महत्या करू नका.’

त्याच्यासारखी अनेक मुले शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत म्हणून दरवर्षी १५ दिवस राज्यभर फिरून जनजागृती करतात. निशांत त्याच जनजागृती यात्रेत भेटला. म्हणाला, ‘मला आता शेतीत जायचे नाही. पण कमिशनर व्हायचे आहे. त्याच्यासाठी यूपीएससीची परीक्षा द्यायची आहे. शेतीमध्ये सुधारणा करायची असेल तर अधिकारी व्हावं लागतं.’

त्या कापडदुकानातच पल्लवी दिनेश पवार भेटली. ही आठवीत शिकते. ती मूळची चाळीसगाव तालुक्यातील चांबर्डी गावातील. ती म्हणाली, ‘वडिलांनी स्वत:ला संपवलं. कधी झालं ते नाही माहीत, पण आता आई दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते. दिवाळीत आश्रमशाळेत येते भेटायला.’ पल्लवीच्या मामाने तिला आश्रमामध्ये आणून सोडले होते. पल्लवी आता शेतीत राबणाऱ्या माणसाला सांगते, ‘तुमच्या मुलांना आश्रमात शिकावं लागू नये म्हणून तरी आत्महत्या करू नका!’

डोक्यावर टोपी, कपाळाला गंध, अंगावर पांढरे कपडे घातलेली अशी ही ४०- ५० मुले गेल्या आठ दिवसांपासून मराठवाडय़ात जनजागृती करीत फिरत आहेत. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी ‘साई चॅरिटेबल ट्रस्ट’कडून एक आश्रम चालविला जातो. तेथील निशांत, ज्योती धोडी, आकांक्षा अशी अनेक मुले-मुली शेतकऱ्याला जगण्याची उमेद देण्यासाठी गावोगावी जातात. शेतीत राबणाऱ्या माणसाला शपथ देतात, आपल्या मागून म्हणायला लावतात, ‘काहीही झाले तरी आत्महत्या करणार नाही.’

शेतीसमस्येवर भाष्य करणारे एक पथनाटय़ बसवून ते गावोगावी दाखविण्याचा हा उपक्रम गेल्या तीन वर्षांपासून राबविणारे त्र्यंबकराव गायकवाड म्हणाले, ‘तशी मदत देणारे खूप आहेत. या मुलांना त्रास होऊ नये म्हणून सर्वतोपरी सहकार्यही मिळतं, पण असं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना सांभाळायचं काम पुढे उभंच राहू नये, अशी परिस्थिती निर्माण करणं आवश्यक आहे. ते केवळ निसर्गावर अवलंबून नाही. त्यासाठी सरकारलाही नीट धोरणं आखावी लागतील.’ या प्रश्नांची खरी उत्तरे शेतीच्या आकारातही दडल्याचे सांगितले जाते. या अनुषंगाने काम करणारे भगवान कापसे म्हणाले, ‘बहुतांश आत्महत्या करणाऱ्यांच्या शेतीचा आकार लक्षात घेतला तर बरेच काही ध्यानात येईल. शेतीचा आकार आक्रसला आहे. तो वाढविण्यासाठी गटशेती हा अत्यंत चांगला मार्ग आहे. जालना आणि औरंगाबाद जिल्हय़ात तीन हजार शेतकरी आता गटशेतीचा प्रयोग करीत आहेत. उत्पादन खर्चात होणारी बचत आणि मालाला एकत्रित बाजारपेठ मिळत असल्याने अनेकांचे आयुष्य बदलू लागले आहे. काही नवे प्रयोग करण्याची गरज आहे. पण सल्ला देऊन भागणार नाही तर गावोगावी गटशेतीला प्रोत्साहित करण्यासाठी कार्यकर्ते निर्माण व्हायला हवेत. त्यांनी प्रयोग करायला हवेत. तरच शेती परवडेल.’ शेतीच्या समस्यांचे विश्लेषण या मुलांना कदाचित करता येत नसेल? पण ते प्रश्न सुटायला हवेत, असे त्यांना मनापासून वाटते. आकांक्षाला डॉक्टर व्हायचे आहे, तर निशांतला अधिकारी होऊन शेतीतील समस्या सोडवायच्या आहेत. या जागृतीयात्रेशी संबंधितांचे एकच सांगणे आहे, की या मुलांची स्वपं्न पूर्ण करण्यासाठी मदतीचे हात पुढे येत असले तरी शेती समस्या सोडविण्यासाठी गावोगावी शेतीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज आहे. पाऊस कमी असतानाही आणि चांगला पडल्यावरही. कारण तसे कार्यकर्ते नसतील तर मागच्या पानावरून पुढच्या पानावर असेच चालू राहील आणि कोण्या निशांत वा पल्लवीला जनजागृतीसाठी सातत्याने फिरावे लागेल.