३५०० जणांना सुरक्षित स्थळी हलवले; एकाचा मृत्यू

नाशिक जिल्ह्य़ात झालेल्या अतिवृष्टीचा औरंगाबाद जिल्ह्य़ाला फटका बसला असून गोदावरी नदीला आलेल्या पुरात वैजापूर व गंगापूर तालुक्यातील ३ हजार २११ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. वैजापूर तालुक्यातील पुरणगाव, लाखगंगा, बाबतारा व डोणगाव या गावांतील सखल भागात ५० घरांमध्ये पाणी शिरले असून वैजापूर येथील अवलगाव येथे पुराचे पाणी पाहण्यास गेलेल्या प्रशांत मोहन सवाई (२२) याचा मृत्यू झाला. पुराच्या पाण्यात तो वाहून जात होता. त्याला बाहेर काढण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास मृत्यू झाला. पुरामुळे वैजापूर व गंगापूर तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळे सोडण्यात आलेल्या पाण्याचा वेग एवढा होता, की नांदूर-मधमेश्वर येथून सकाळी ६ वाजता गोदावरीच्या पात्रात २ लाख २१ हजार क्युसेक वेगाने पाणी सुरू होते. सायंकाळपर्यंत पाण्याचा वेग काहीसा मंदावला. सायंकाळी तो १ लाख ५६ हजार क्युसेकवर आला होता. वैजापूर तालुक्यातील भालगावचा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे, तर पुलावरून पाणी वाहत असल्याने चार गावांचा संपर्क तुटला आहे. बाभूळगाव गाव, सावखेडा, नांदूरढोक या गावांना पर्यायी रस्ते असल्याने वाहतूक सुरू आहे. मात्र, वांजरगाव येथे पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता बंद आहे. याच गावातील शिंदे वस्तीत ३०० जण वेढले गेलेले आहेत. मात्र, त्यांना कोणताही धोका नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जिल्हाधिकारी निधी पांडेय व पोलीस अधीक्षक वैजापूर येथील स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गंगापूर तालुक्यातील ७६ कुटुंबातील ३४८ जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. वैजापूर तालुक्यातील पूरपरिस्थितीमध्ये जीवित हानी होऊ नये म्हणून एनडीआरएफचे २५ जवान तीन बोटींसह मदतीसाठी पुण्याहून निघाले आहेत. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ते देवगडपर्यंत पोहोचले होते. वैजापूर तालुक्यातील सरलाबेट येथे उंचावर ७० जण अडकले आहेत. पूर परिस्थिती येण्यापूर्वी प्रशासनाकडून सावध करण्यात आले होते. त्यांनी सुरक्षित स्थळी यावे, अशी विनंती करूनही तेथील नागरिकांनी त्यास नकार दिला.

महाबळेश्वरमध्ये रस्ते ‘फाटले’

महाबळेश्वरमधील पावसाचा जोर सलग तिसऱ्या दिवशी कायम असून, गेल्या चोवीस तासांत इथे पुन्हा ४१०.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर मागील दोन दिवसांत इथे ७९९ मिलिमीटर पाऊस पडला आहे. दरम्यान, या प्रचंड पावसामुळे परिसरातील अनेक रस्ते खचले आहेत तर घरांना तडे गेले आहेत. भूस्खलनाच्या घटनाही घडल्या आहेत. दरम्यान, पुढील काही दिवस पर्यटकांसाठी हे पर्यटनस्थळ बंद करण्यात आल्याचे वन विभागातर्फे सांगण्यात आले. महाबळेश्वर-पाचगणीत गेल्या तीन दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे. या पावसामुळे तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. ओढेनाल्यांना पूर आले आहेत. रस्ते, वस्त्यांना पाण्याचा वेढा पडला आहे. तालुक्यातील अनेक छोटेमोठे पूल पाण्याखाली गेल्याने दळणवळणही ठप्प झाले आहे.