गुलाब, निशिगंधाचे दर कवडीमोल

औरंगाबाद : राज्यात करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक जिल्ह्य़ात टाळेबंदी लागू करण्यात आलेली असून सण, मंगल कार्य, सभा, संमेलनांचे कार्यक्रम, सोहळे रद्द झाले आहेत. त्यामुळे फुलांची मागणीही घटलेली असून दरही गडगडल्याने फुलशेती उत्पादक अडचणीत सापडले आहेत.

राज्याच्या विविध भागासह मराठवाडय़ातही आठवडाभरापूर्वी झालेला अवकाळी पाऊस, गारपिटीचाही फटका कमी-अधिक प्रमाणात फुलशेती उत्पादकांना बसला आहे. पैठण तालुक्यातील विहामांडवा परिसरातील वडजी गावचे शेतकरी मनोज गोजरे सध्या गलांडा, गुलाब, निशिगंधाचे दर कोसळल्याने हवालदिल झाले आहेत. करोनाच्या पहिल्या टाळेबंदीनंतर पूर्ववत झालेल्या व्यवहारचक्रात फायद्याची ठरत असलेली फुलशेती अचानकपणे आता तोटय़ात आली आहे. दीड ते दोन रुपये प्रतिगुलाब विक्री केलेल्या गोजरे यांना आता १० ते १५ रुपये किलोने गुलाब विक्री करावा लागत आहे. फेब्रुवारीपर्यंत दीडशे रुपये किलोने विक्री होत असलेल्या निशिगंधाला आता ३० ते ४० रुपये किलोने मागितले जात आहे.

निशिगंधाला गणपतीच्या काळात ५०० रुपये किलोने मागणी होती. तर ८० ते ९० रुपये देऊन खरेदी करण्यात येणाऱ्या गलांडा फुलाचा आजचा दर तीन ते पाच रुपये किलो एवढा खाली आल्याचे शेतकरी मनोज गोजरे यांनी सांगितले.

वडजीतील दीड एकरात गुलाब, निशिगंध व गलांडा फुलांची शेती केलेली आहे. गतवर्षी टाळेबंदीमुळे डाळिंबाच्या शेतीत फारसा फायदा झाला नाही. मेहनत, खत, फवारणीच्या खर्चापुढे झालेला फायदा अगदीच नगण्य ठरला. त्यामुळे फुलशेतीकडे वळल्याचे गोजरे सांगतात. टाळेबंदी उठून व्यवहारचक्र पूर्ववत होऊ लागल्यानंतर फुलांना मागणी वाढली होती. फेब्रुवारीपर्यंत मागणी चांगली होती. आता मात्र, दर गडगडले. मजुरांवरच ६०० रुपये दररोजचा खर्च होत आहे. त्यात औरंगाबादला पाठवण्यासाठी ३०० रुपये वाहतूक खर्च येतो. हातात शंभर ते दोनशे रुपयेही येत नाहीत. पुण्याच्या व्यावसायिकांकडूनही केलेली फुलांची मागणी आता रद्द केली जात असल्याचे मनोज गोजरे यांनी सांगितले