पहिल्यांदाच नगरपंचायत झालेल्या शिरुर, वडवणी, पाटोदा आणि आष्टी या चार नगरपंचायतीसह २३ ग्रामपंचायतींची निवडणूक १ नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. विधानसभा निवडणुकीनंतर चालू महिन्यात तीन बाजार समितीच्या निवडणुकांचा धुराळा शांत होताच चार नगरपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याने भाजप व राष्ट्रवादीच्या नेत्यांची पुन्हा एकदा स्थानिक नगरपंचायती ताब्यात घेण्यासाठी राजकीय प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
बीड जिल्ह्यात तालुक्याचे गाव असलेल्या शिरुर, वडवणी, पाटोदा आणि आष्टी या चार ग्रामपंचायतींना याच वर्षी नगरपंचायतींचा दर्जा जाहीर करण्यात आला. नगरपंचायतीचा दर्जा जाहीर झाल्याने या पंचायतीच्या क्षेत्रातील प्रभागाची पुनर्रचना झाली असून १ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार असल्याचेही आयोगाने जाहीर केले. तालुक्याचे ठिकाण असलेल्या नगरपंचायतीची निवडणूक विधानसभा मतदारसंघातील सत्ताधारी पक्षांच्या आमदारांसाठी प्रतिष्ठेची होणार आहे. भाजपचे आमदार असलेल्या या नगर पंचायतीची सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभूत माजी आमदारांनीही कंबर कसली आहे. आष्टी मतदारसंघातील आष्टी, शिरुर, पाटोदा या तीन नगरपंचायतीची निवडणूक होत आहे. तीनही ठिकाणच्या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुरेश धस यांचे वर्चस्व होते. त्यामुळे भाजपचे आमदार भीमराव धोंडे यांना नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायती ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. तर माजलगाव मतदारसंघातील वडवणी नगरपंचायतीत पुन्हा एकदा भाजपचे आमदार आर. टी. देशमुख आणि माजी मंत्री प्रकाश सोळंके यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. पंधरा दिवसांपूर्वी वडवणी बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपने यश मिळवले असले तरी मतमोजणीत झालेल्या हेराफेरीने भाजपच्या यशावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.  माजलगाव व अंबाजोगाई बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपच्या पॅनलचा दारुण पराभव झाला. या पाश्र्वभूमीवर आता चार नगरपंचायत निवडणुकींची रणधुमाळी सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीत सहापकी पाच मतदारसंघात भाजपचे आमदार निवडून आल्याने राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांनी मतदारसंघात संपर्क वाढवून जनमत मिळवण्याचा प्रयत्न चालवला असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ता असूनही भाजपच्या पॅनलला पराभवाची चव चाखावी लागत आहे.