मनपासह, व्यापारी, पोलीस, सामाजिक संस्था सरसावल्या

औरंगाबाद : कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वच स्तरातील नागरिकांचे मदतीचे हात पुढे येत आहेत. मंगळवारी महानगरपालिका, व्यापारी, पोलीस, तरुण, सामाजिक संघटनांच्या माध्यमातून खाद्यान्न, बिस्कीट, औषधी, पाण्याच्या बाटल्या, कपडय़ांचे साहित्य जमवून ते वाहनांद्वारे पूरग्रस्त भागात पाठवण्यात आले आहेत.

व्यापारी महासंघाकडून पाच लाखांच्या मदतीचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी जनार्दन काळे, मानसिंग पवार, अनंत बोरकर, सहायक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे आदींची उपस्थिती होती.

महानगरपालिकेत महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर औताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत औषधांचे साहित्य भरलेले वाहन रवाना करण्यात आले. याशिवाय चार जणांचे वैद्यकीय पथकही रवाना झाले. यामध्ये डॉ. बाबासाहेब उनवणे, संजय आडके, शेख अल्ताफ, गोविंद गिरी आदींचा समावेश आहे. अभ्युदय फाउंडेशनच्यावतीने मदतीचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शेकडो औरंगाबादकरांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जमेल तशी मदत केली. मदतीच्या पहिल्या टप्प्यात जमा झालेले साहित्य घेऊन ट्रक सोमवारी शाहूवाडी, बिद्री व राधानगरी तालुक्यात रवाना झाला. सोबत एमजीएमच्या वृत्तपत्रविद्या व जनसंवाद महाविद्यालयाचे पंधरा विद्यार्थीही रवाना झाले आहेत. एका ट्रकमध्ये दहा हजार पाण्याच्या बाटल्या, सहा हजार बिस्कीट पुडे, चादरी, बेडशीट, फिनेल आदी वस्तूंचा समावेश आहे. या ट्रकला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबादचे अध्यक्ष अंकुशराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

याप्रसंगी प्राचार्या डॉ. रेखा शेळके, सुहास तेंडुलकर, आशा माने, कचरू जाधव आदींची उपस्थिती होती. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभ्युदयचे अध्यक्ष नीलेश राऊत, सचिव सुबोध जाधव, गणेश घुले आदींनी परिश्रम घेतले.

औषधनिर्माण कंपनींच्या प्रतिनिधींनी, काही डॉक्टर व औषध विक्री दुकानदारांकडून पाच लाखांची औषधे, इतर आवश्यक साहित्य पूरग्रस्तांसाठी पाठवण्यात आल्याची माहिती व्यापारी निखिल हरिश्चंद्र मित्तल, भावेश सराफ यांनी सांगितले.

पोलीस विभागाच्या गुन्हे शाखेनेही मदतीचा हात पुढे केला आहे. गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मिळून २५ ते ३० हजार रुपयांचा निधी जमा करून पोलीस आयुक्तांकडे सुपूर्द केला असून तो मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केला जाणार आहे, असे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितले.