औरंगाबाद येथील अतिक्रमणाच्या मुद्यावरून राजीनाम्याचा इशारा दिलेले शिवसेना आमदार पुत्र आणि नगरसेवक सिद्धांत शिरसाट यांनी आपली तलवार म्यान केली. स्थायी समितीचे सभापती आणि सभागृहाच्या विनंतीनंतर त्यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा देण्याचा आणि अनवाणी फिरण्याची प्रतिज्ञा मागे घेतली. यावेळी त्यांनी अतिक्रमण हटवलं तर बघून घेऊ, अशी धमकी निनावी फोनद्वारे देण्यात आल्याचे सांगितले. माझ्याकडे परवाना असलेली बंदूक आहे. वेळ पडली तर मी स्वतःच्या रक्षणासाठी त्याचा वापर करु शकतो, अशा शब्दांत त्यांनी धमकी देणाऱ्याला इशारा दिलाय.

आठवडाभरापूर्वी वॉर्डातील अतिक्रमण हटवल नाही तर आपण राजीनामा देणार असल्याचा इशारा सिद्धांत शिरसाट यांनी दिला होता. तोपर्यंत पायात चप्पल न घालण्याची प्रतिज्ञा देखील त्यांनी केली होती. कारवाई न झाल्याने बुधवारी पाच वाजता राजीनामा देणार असल्याचं त्यांनी जाहीर केले. मात्र, शिवसेना नगरसेवक आणि सभापती यांनी समजूत काढल्यानंतर त्यांनी आपला निर्णय बदलला. शिरसाट यांच्या इशाऱ्यानंतर सोमवारी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचं पथक कारवाईसाठी गेले होते. नागरिकांच्या रोषामुळे कारवाई न करताच त्यांना परतावे लागले.

अतिक्रमण विभागाच्या जेसीबीवर दगडफेक झाल्याची घटना देखील घडली. पेट्रोल पंपाचं अतिक्रमण हटवल्याशिवाय एकाही दुकानावर कारवाई करु नये, अशी भूमिका दुकानदारांनी घेतली. कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, कारवाई झाली नाही. प्रशासकीय अधिकारी अतिक्रमण धारकांना पाठीशी घालत असल्याचा आरोप देखील करण्यात येत आहे. गेल्या दोन दशकांपासून औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेची एक हाती सत्ता आहे. महानगरपालिकेत शिवसेनेचा महापौर, शहरात शिवसेनेचा खासदार आणि नगरसेवक सिद्धांत शिरसाट यांचे वडील संजय शिरसाट स्वतः शिवसेनेच्या तिकिटावर औरंगाबाद पश्चिम मतदार संघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. शहराची सर्व सूत्रे शिवसेनेच्या हातात असतानाही सिद्धांत शिरसाट यांच्या वॉर्डात अनेक समस्या प्रलंबित आहेत.