सहकार विभागाकडून घराची झडती

सावकारीचा परवाना नसताना लाखो रुपयांचे आर्थिक व्यवहार, व्यवहारापोटी शेतजमीन, प्लॉट स्वत:सह कुटुंबीयांच्या नावे करून घेणारा उस्मानाबाद येथील अवैध सावकार दत्ता बाळासाहेब देवकते हा सहकार खात्याच्या गळाला लागला आहे. देवकते याच्या त्रासाला कंटाळलेल्या तीन शेतकऱ्यांनी धाडस करून दाखल केलेल्या तक्रारीनुसार सहकार खात्याने त्याच्या घराची झडती घेतली. झडतीत सापडलेल्या पुराव्यानुसार दत्ता देवकते याच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पथकप्रमुख तथा वाशीचे सहायक निबंधक एम. एल. शिंदे यांनी दिली आहे.

शहरातील वैराग रोड परिसरातील रहिवासी दत्ता बाळासाहेब देवकते हा अवैध सावकारीचा व्यवसाय करतो. आपल्या सावकारकीच्या धंद्यात त्याने काही शेतकऱ्यांना कर्ज देऊन त्यांच्याकडून शेतजमिनी लिहून घेतल्या. काही जणांना करारनामे, शपथपत्र, कोरे धनादेश घेऊन त्यांची मोठी लूट केली आहे. त्याच्या त्रासाला कंटाळलेल्या अशाच तीन सावकारांनी सहकार खात्याकडे त्याच्याविरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारीची दखल घेऊन जिल्हा उपनिबंधक ए. बी. वागळे यांच्या मार्गदर्शनानुसार अवैध सावकार दत्ता देवकते याच्या घराची झडती घेण्यासाठी वाशीचे सहायक निबंधक एम. एल. शिंदे, बी. एच. सावकर, एस. टी. माळी, एस. सी. माळी, एस. एन. शिंदे, ए. टी. सोलंकर, मोटे आदींचे पथक तयार करण्यात आले. या पथकाने मंगळवारी वैराग रोड परिसरात राहणारे दत्ता देवकते याच्या घराची झडती घेतली. या झडतीत पथकाच्या हाती ३९ लाख रुपयांचे आíथक व्यवहार केलेल्या नोंदी असलेल्या डायऱ्या, करारनामे, २९ एकर शेतजमिनीचे स्वत:सह कुटुंबीयांच्या नावे करण्यात आलेले सातबारे, तीन प्लॉट व अन्य दस्तऐवज सापडला आहे. या पथकाने सर्व दस्तऐवज, कागदपत्रे हस्तगत करून त्याच्या हिशोबाचा लेखाजोखा जिल्हा उपनिबंधक ए. बी. वागळे यांच्याकडे सादर केला असून कोणताही परवाना नसताना अवैध सावकारी करून आíथक लूट करणाऱ्या दत्ता देवकते याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सहायक निबंधक िशदे यांनी दिली.

सख्ख्या भावाकडे सावकारीचा परवाना

अवैध सावकारी करून शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या दत्ता देवकते याचा भाऊ पाताळ बाळासाहेब देवकते याच्याकडे जनसेवा फायनान्स या नावे सावकारीचा परवाना आहे. त्याच्याही घराची झाडाझडती पथकाने केली असून त्याच्याकडे काही धनादेश, शपथपत्रे, करारनामे व अन्य कागदपत्रे सापडली आहेत. त्याच्याकडे परवाना असल्याने त्याने रीतसर या व्यवहाराची माहिती सहकार खात्याला दिली आहे की नाही याबाबत खात्री करून नियमबाह्य आíथक व्यवहार केल्याचे उघडकीस आल्यास त्याच्यावरही फौजदारी दाखल होणार आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी तक्रारी कराव्यात : वागळे

जिल्ह्यात कुठेही अवैध सावकारी सुरू असल्यास अथवा शेतकऱ्यांच्या जमिनी फसवणूक करून बळकावल्या आहेत, अशा सावकारांच्या तक्रारी शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर चौकशीअंती संबंधित सावकार दोषी ठरल्यास अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी तसेच रक्कम असल्यास रक्कम त्यांना परत मिळू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी अन्याय सहन न करता तक्रार देण्यास पुढे यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक ए. बी. वागळे यांनी केले आहे.