कोरेगाव भीमा प्रकरणी मिलिंद एकबोटे, मनोहर उर्फ संभाजी भिडे आणि अनिल दवे यांच्यासह २० ते २५ जणांविरोधात अट्रॉसिटी अंतर्गत औरंगाबाद येथील छावणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयश्री सुदाम इंगळे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांतील तक्रारीनुसार, एक जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी शहरातील भावसिंगपुरा भागात राहणाऱ्या जयश्री इंगळे आणि त्यांचे सहकारी गेले होते. आरोपींनी त्यांची गाडी आडवून त्यांच्यावर दगडफेक केली. यावेळी त्यांना जातीवाचक शिवीगाळदेखील करण्यात आली. तहाण लागल्यामुळे पाणी मागितले असता एकाने तुम्ही पाणी देण्याच्या लायकीचे नसल्याचे म्हणत बहिष्कार टाकल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

कोरेगाव भीमा ते शिक्रापूरदरम्यान ही घटना घडली असल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. तक्रारीवरून एकबोटे, भिडे आणि दवे यांच्यासह २० ते २५ जणांविरोधात अट्रॉसिटी आणि इतर कलमांनुसार औरंगाबाद शहरातील छावणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा घडल्याचे ठिकाण हे शिक्रापूरजवळ असल्याने छावणी पोलिसांनी पुणे ग्रामीण पोलीस शिक्रापूर पोलीस स्टेशन यांच्याकडे गुन्हा वर्ग केला आहे.