24 January 2020

News Flash

जायकवाडी ७१ टक्क्यांवर; मेघ बीजरोपणाची चाचणी पूर्ण

जायकवाडी जलाशयात ७१ हजार ३३५ क्यूसेक वेगाने नाशिकमधील पुराचे पाणी दाखल होत आहे

मराठवाडय़ातील तीव्र दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर जायकवाडीमध्ये दाखल होणारे पाणी ही आनंदाची बाब असली तरी दररोज जायकवाडीची टक्केवारी नक्की किती झाली याची उत्सुकता औरंगाबादकरांना असते. जायकवाडी धरण शुक्रवारी ७१.१९ टक्क्य़ांपर्यंत भरले आहे. जायकवाडीतून माजलगावला पाणी दिले जावे, अशी प्रकल्प अहवालात तरतूद असल्याने टक्का वाढल्यानंतर माजलगावसाठी २०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. एकीकडे धरणातून पाणी सोडले जात असताना जायकवाडी वगळता अन्य धरणातील पाणीसाठा वाढावा म्हणून कृत्रिम पावसाची चाचणी पूर्ण करण्यात आली. मात्र, विमान उड्डाणानंतर कृत्रिम पाऊस पडला की नाही, हे मात्र प्रशासनाला समजू शकले नव्हते. ही प्रक्रिया परिपूर्ण होण्यासाठी आणखी दोन दिवस जाऊ शकतात, असे महसूल उपायुक्त खडके यांनी सांगितले.

जायकवाडी जलाशयात ७१ हजार ३३५ क्यूसेक वेगाने नाशिकमधील पुराचे पाणी दाखल होत आहे. धरणाची टक्केवारी दर दोन तासाला वाढत आहे. धरण जेव्हा ८४ टक्क्य़ाला जाईल तेव्हा अधिकचे पाणी नदीपात्रात सोडावे लागेल, असा नियम आहे. तोपर्यंत धरणांमधील पाणीपातळी वाढू दिली जाईल. दरम्यान, मराठवाडय़ात मोठे पाऊस न झाल्यामुळे अजूनही पाणीटंचाई हटलेली नाही. गोदावरीवर अवलंबून नसणाऱ्या उस्मानाबाद, लातूर, बीडचा काही भाग येथे टंचाईची स्थिती अधिक जाणवत आहे. पडणाऱ्या पावसामध्ये वृद्धी व्हावी म्हणून मेघ बीजरोपण केले जात आहे. ४८ फ्लेअर्स असणारे विमान शुक्रवारी दुपारी १२च्या दरम्यान औरंगाबाद विमानतळावरून उडाले. यावेळी आपत्ती व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पर्जन्यवृष्टीसाठी योग्य ढग सापडतात का, याचा दररोज आढावा घेतला जाणार असून जलधारण क्षमतेनुसार कृत्रिम पावसाचा प्रयोग हाती घेतला जाणार आहे. शुक्रवारी मेघबीजरोपण करण्यात आले नाही. जायकवाडी धरणात याच वेगाने पाणी आले तर नदीपात्रात पाणी सोडावे लागेल, असा अंदाज आहे. ८४ टक्क्य़ांच्या पुढे धरणाची टक्केवारी गेली तर काळजी घ्यावी, असे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

First Published on August 10, 2019 12:48 am

Web Title: jaikwadi dam at 71 abn 97
Next Stories
1 मुस्लिमांची मते मौलवींच्याच हाती
2 आता वंचित बहुजन आघाडीचेही ‘केडर’
3 मराठवाडय़ाला ११० टीएमसी पाण्यासाठी आराखडे
Just Now!
X