News Flash

मराठवाडय़ातील चार प्रकल्पांमध्ये २५ ते ५० टक्क्य़ांहून कमी पाणीसाठा

ऑगस्ट महिन्याच्या सरासरी पावसानुसार बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्य़ात पावसाची स्थिती फारशी समाधानकारक नाही.

मराठवाडय़ातील चार प्रकल्पांमध्ये २५ ते ५० टक्क्य़ांहून कमी पाणीसाठा

औरंगाबाद : पाऊस मागील तीन-चार दिवसांपासून सतत बरसत असला तरी काही मोठय़ा प्रकल्पांमधील पाणीसाठय़ात वाढ झालेली नाही. गुरुवारच्या आकडीनुसार मराठवाडय़ातील प्रमुख प्रकल्प असलेल्या पैठणच्या नाथसागरात जेमतेम ४०.६३ टक्केच पाणीसाठा होता. नाथसागरात गतवर्षी २३ ऑगस्टपर्यंत ८० टक्क्य़ांवर पाणीसाठा पोहोचलेला होता. तर यंदा उस्मानाबाद जिल्ह्य़ातील सीना कोळेगाव प्रकल्पात उणे ५.७६ टक्के पाणी आहे. अर्धा पावसाळा सरल्यानंतरही तेरापैकी चार प्रकल्पांमध्ये २५ ते ५० टक्क्य़ांच्या आसपासच पाणीसाठा आहे.

सीना कोळेगाव प्रकल्प असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्य़ातील पावसाची स्थितीही नाजूक आहे. उस्मानाबादेत ऑगस्ट महिन्यात १६.४ मिमी पाऊस झाला आहे. या जिल्ह्य़ाचे ऑगस्टचे सरासरी पर्जन्यमान ९४.६ मिमी असून चालू महिन्याचे २० दिवस सरले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्य़ाचे जून-जुलै महिन्याचे सरासरी पर्जन्यमान हे २६४ मिमी असून सुरुवातीला चांगला पाऊस झाला. या दोन महिन्यात ३४२.२ मिमी पाऊस झाला असून सरासरीच्या तुलनेत १२९.६ टक्के पाऊस झाला आहे. निम्न तेरणा प्रकल्पात ५३.१७ टक्के पाणीसाठा आहे. लातूरच्या मांजरा धरणातही जेमतेम २१.४९ टक्के पाणीसाठा आहे. शहागड बंधाऱ्यात २०.१८ टक्के पाणी आहे. माजलगाव प्रकल्पात ३२.३७ टक्के साठा आहे. परभणीच्या येलदरी प्रकल्पांत ७९.४५ टक्के तर हिंगोलीच्या सिद्धेश्वर प्रकल्पात ९७.५९ एवढा पाणीसाठा असून नांदेडचा विष्णूपुरी प्रकल्प पूर्णपणे म्हणजे १०० टक्के भरलेला आहे. पेनगंगामध्ये ७०.४५, मानार प्रकल्पात ९४.१७, निम्न दुधनामध्ये ८७.२७, खडका बंधारामध्ये ९९.८३ टक्के पाणीसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

ऑगस्ट महिन्याच्या सरासरी पावसानुसार बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्य़ात पावसाची स्थिती फारशी समाधानकारक नाही. ऑगस्ट महिन्याची बीडची ८४.६, लातूरची १२४.२ तर उस्मानाबादची ९४.६ मिमी पावसाची सरासरी आहे. या महिन्यात तेथे अनुक्रमे ३८.४, ४७.७ व १६.४ मिमी पाऊस झाला.

परभणी जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठय़ात वाढ

परभणी: जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाळी वातावरण असून गोदावरी नदीपात्रात असलेले बंधारे, लहान—मोठे सिंचन प्रकल्प यात पाण्याचा ओघ सुरू असल्याने जलसाठय़ात मोठय़ा प्रमाणात वाढ  झाली आहे. दरम्यान आज शुक्रवारी जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्याचे वृत्त असून आकाश मात्र दिवसभर ढगाळ होते. दरम्यान आणखी काही दिवस पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्?या हवामान विभागाने वर्तविला आहे. काल गुरुवारी निम्न दुधना प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले. गोदावरी नदीवरील ढालेगाव, तारुगव्हाण, मुद्द्गल, दिग्रस या बंधा?ऱ्यामध्ये पाण्याची आवक वाढली आहे. येलदरी धरणात ७८.३८ टक्के पाणी साठा आहे. तर सेलू तालूक्यातील निम्न दुधना प्रकल्प ८८ टक्के भरले असून प्रकल्पात पाण्याची आवक वाढल्याने गुरुवारी (दि.१९) प्रकल्पाचे ४ दरवाजे ०.३०  मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यातून ४ हजार २३२ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या सर्व गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यंदा जिल्ह्यातील महत्त्वाच्या धरणांसह छोटय़ा सिंचन प्रकल्पातील जलसाठयातही मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या तुलनेत पावसाचा जोर कमी असला तरी हा भीजपाऊस पिकांसाठी मात्र लाभदायी ठरला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2021 12:24 am

Web Title: less than 25 to 50 percent water storage in four projects in marathwada zws 70
Next Stories
1 मराठवाडय़ात सर्वदूर पाऊस; १६ मंडळांमध्ये अतिवृष्टी
2 राज्यपाल नामनिर्देशित अधिसभा सदस्यांच्या रिक्त जागांचा प्रश्न रेंगाळलेलाच
3 मराठवाड्यातील जनआशीर्वाद यात्रेत नाराज घटकांना चुचकारण्यातच भर
Just Now!
X