करोनाच्या भीतीने महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

औरंगाबाद : करोना विषाणूचा फैलाव होऊ शकतो ही भीती लक्षात घेता औरंगाबाद महापालिकेची निवडणूक सहा महिन्यांसाठी पुढे ढकलावी, अशी विनंती लेखी स्वरुपात महापौर नंदकुमार घोडेले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. अशीच मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनीही केली  आहे. दरम्यान, करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पैठण येथे होणारा नाथषष्ठीचा उत्सव रद्द करण्यात आला असून मुस्लीम बांधवांचा इज्तेमाही रद्द करण्यात आल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी पालवे यांनी दिली.

करोना विषाणूचे रुग्ण महाराष्ट्रातही आढळले आहेत. औरंगाबाद या शहरात आंतरराष्ट्रीय पर्यटक येतात. त्यामुळे या विषाणूची लागण होऊ नये म्हणून अधिक जागरुक राहणे आवश्यक आहे. प्रशासन आणि महापालिका या संकटाशी सामना करण्यासाठी सज्ज आहे. सार्वजनिक यात्रांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवरनिवडणुकांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता जोखीम पत्करू नये म्हणून महापालिकेच्या निवडणुका सहा महिन्यांच्या कालावधीसाठी पुढे ढकलाव्यात, अशी विनंती करण्यात आली आहे. एप्रिल २०२० मध्ये महापालिकेच्या निवडणुका प्रस्तावित आहेत. प्रशासन व नागरिक यांच्यातील दुवा मजबूत असणे आवश्यक असल्याने महापालिकेची निवडणूक लांबवावी, अशी विनंती करण्यात आली आहे. दरम्यान, पैठण येथे होणारी यात्रा मंगळवारी रद्द करण्यात आली होती. चितेगाव येथे होणारा इज्तेमाचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे. एका बाजूला निवडणुका घेऊ नका, अशी विनंती महापौरांनी केली असली तरी मनसेकडून मात्र नियोजित वेळेत निवडणुका व्हाव्यात, अशी भूमिका शहर जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी व्यक्त केली.