औरंगाबाद : पैठण येथे संतपीठ, लातूर येथील विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयासाठी ७३ कोटी, उस्मानाबाद येथे वैद्यकीय महाविद्यालय, जालना-नांदेड रस्त्यासाठी तरतूद, भगवानबाबा, गहिनीनाथ गड विकासासाठी निधी, प्राचीन मंदिर संवर्धनाच्या यादीत औरंगाबाद शहरातील सातारा भागातील खंडोबा देवस्थानाच्या विकासाचा संकल्प आदी घोषणा करत मराठवाडय़ातील मंत्र्यांच्या मतदारसंघात निधीचे धोरण अर्थसंकल्पात जपले असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात येत आहे. पर्यटन राजधानी अशी ओळख असणाऱ्या औरंगाबादमधील पर्यटनस्थळाऐवजी लोणार विकासावर भर दिसून आल्याने औरंगाबादची बोळवण फार तर फार ‘नामांतरा’वर अशी टीका केली जात आहे. मराठवाडय़ासाठी अर्थसंकल्पातील तरतुदी जेमतेम असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

महापालिका निवडणुका मार्चमध्ये होतील असे गृहीत धरून शिवसेना मंत्र्यांनी औरंगाबादचे दौरे वाढविले होते. यामध्ये पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनीही दौरा केला होता. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्य़ातील पर्यटनस्थळांना अधिक वाव मिळेल असे चित्र निर्माण करण्यात आले होते. अनेक मान्यवरांशी चर्चा केल्यानंतर जिल्ह्य़ातील पर्यटनासाठीही काही तरतुदी जाहीर होतील असे अपेक्षित होते, पण तसे अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणातून दिसून आले नाही. संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघातील संतपीठाची घोषणा करण्यात आल्याने या वर्षांत त्याच्या उभारणीला चालना मिळू शकेल. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी तरतूद करून घेतली. मात्र मोजकेच मतदारसंघ वगळता मराठवाडय़ातील बहुतांश मतदारसंघाला काही एक लाभ मिळाला नसल्याची टीका भाजप आमदारांकडून होत आहे. या अनुषंगाने बोलताना आमदार हरिभाऊ बागडे म्हणाले, ‘हा अर्थसंकल्प मुंबई आणि पुणे या शहरांसाठी आहे. मराठवाडय़ासाठी त्यात काही नाही. जे शेतकरी नियमित कर्ज फेडतात त्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्याकडे दुर्लक्ष झाले.

वॉटर ग्रीड योजना सुरू राहील असे सांगितले पण रक्कमच मंजूर केली नाही. तसेच उद्योगांना दिलेल्या १२०० कोटी रुपयांच्या वीज सवलतीच्या योजनेला फाटा देण्यात आल्याचेच दिसून येत आहे. जलसंधारण आणि पाणी संचय योजनासाठी निधी मिळाला नसल्याची टीका केली जात आहे.