औरंगाबाद : करोना महामारीपासून दूर राहण्यासाठी मुखपट्टय़ांची गरज आणि त्याची मागणी लक्षात घेता आता निर्मितीच्या कामात मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीही उतरली आहे. समितीच्या जिल्हा पातळीवर दुकानांमधून मास्कला बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात असून माफक दरात आणि भारत सरकारकडून प्रमाणित करण्यात आलेल्या (आयएसओ) सुती कपडय़ापासून लाखोंच्या संख्येने मुखपट्टय़ा निर्मिती करण्याची तयारी खादी ग्रामोद्योगाने सुरू केली आहे.

मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे नांदेड येथे प्रधान कार्यालय असून तेथेच शिवण कामाचा विभाग आहे. तर या ठिकाणी औसा, कंधार आदी ठिकाणी तयार होणारे खादीचे कापड आणले जाते. या कापडापासून आता मुखपट्टटय़ांची निर्मिती संस्थेचे सचिव ईश्वरराव भोसीकर यांच्या संकल्पनेतून सर्व चमू तयार करण्याचे काम करत आहे, अशी माहिती मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे संचालक तथा औसा येथील प्रकल्पाचे व्यवस्थापक रघुनाथराव पोतदार यांनी दिली.

तयार मुखपट्टय़ांना नांदेड, लातूरसह इतर जिल्ह्य़ातील खादीची उत्पादने विक्री करण्यात येणाऱ्या दुकानांमध्ये ठेवण्यात येत आहे. खादीचा कपडा हा सर्व आवश्यक आणि शुद्धतेच्या प्रक्रिया पूर्ण करूनच तयार केला जात असून भारत सरकारकडून प्रमाणित झालेला असतो. खादीच्या कोणत्याही कपडय़ातून मिळणारा नफा हा आमच्या कामगारांच्या हाती पडतो. शिवाय दरही माफक ठेवण्यात आलेले आहेत. आतापर्यंत मुखपट्टय़ा किंवा त्यासाठी कापड काही जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवरही देण्यात आले आहे, असेही पोतदार यांनी सांगितले.