22 September 2020

News Flash

मराठवाडा जातीय ध्रुवीकरणाच्या उंबरठय़ावर!

मराठा संघटनांकडून औरंगाबादेत निघालेल्या मूक मोर्चानंतर जातीय ध्रुवीकरण वाढविणाऱ्या घटनांची मालिकाच सध्या सुरू आहे.

संग्रहित छायाचित्र

 

घटना क्र. १- मराठवाडय़ात अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर राहणाऱ्या आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी अचानक दिल्लीमध्ये देशव्यापी अखिल भारतीय तैलिक साहू महासभेच्यावतीने मेळावा घेतला. या सभेत देशभरात १४ कोटींच्या संख्येने तेली समाज असल्याचे क्षीरसागर यांनी प्रास्ताविकात मांडले. तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर होते. तेली समाज विदर्भात मतदानावर प्रभाव पाडेल, एवढय़ा संख्येने असल्याचा दावा केला जातो. त्या मुळेच मुख्यमंत्रीही दिल्लीतील कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.

घटना क्र. २ – औरंगाबाद येथे अण्णासाहेब जावळे यांची छायाचित्रे लावून छावा संघटनेने आरक्षणाला बळकटी मिळावी म्हणून एक मेळावा घेतला. या मेळाव्याला खास गुजरातच्या हार्दिक पटेल यांना आवर्जून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनीही बहुसंख्याकांना ‘मागास’ श्रेणीतील आरक्षण का दिले जावे, याची मांडणी केली. मराठा संघटनांकडून औरंगाबादेत निघालेल्या मूक मोर्चानंतर जातीय ध्रुवीकरण वाढविणाऱ्या घटनांची मालिकाच सध्या सुरू आहे.

घटना क्र. ३ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राहिलेले शिवलंग शिवाचार्य यांनी हिंदुत्वाची मांडणी करण्याऐवजी नवीन मार्ग स्वीकारला आहे. लिंगायत धर्माला मान्यता मिळावी यासाठी आंदोलन सुरू केले. औरंगाबादेत काही महिन्यांपूर्वी म्हणजे कर्नाटक निवडणुकीच्या आधी लिंगायत धर्माच्या मागणीचा मोर्चा चर्चेत होता. अर्थात या मोर्चाला म्हणावी अशी गर्दी मराठवाडय़ात जमू शकली नाही. पण सोलापूरमध्ये याच मागणीच्या अनुषंगाने काढण्यात आलेल्या मोर्चाला मोठी गर्दी होती. लातूर, औसा, नांदेड, उस्मानाबाद आणि उमरगा या जिल्ह्य़ातील काही मतदारसंघात लिंगायत मतदानाचा प्रभाव खूप अधिक आहे. लातूर लोकसभा मतदारसंघातील उमरगा या विधानसभा मतदारसंघावर माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे खासे लक्ष असे. याच तालुक्यातील मूळ रहिवासी बसवराज पाटील सध्या औसा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

घटना क्र. ४ – लातूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वडार समाजाचा राज्यस्तरीय मेळावा नुकताच घेण्यात आला. त्यांनाही आरक्षण, सवलती दिल्या जातील असे आवर्जून सांगण्यात आले.

या काही घटना, घडामोडींच्या आधी मराठवाडय़ात सातत्याने ध्रुवीकरणाचे प्रयोग पद्धतशीरपणे झाले. ब्राह्मण संघटनांची अधिवेशनेही मराठवाडय़ातच झाली होती. बीड आणि परभणी ही अधिवेशनाची ठिकाणे होती. अलिकडेच परशुराम जयंतीलाही नवी झळाळी दिली जात आहे. रामनवमीला डॉल्बीही लावली जात आहे. हे नवे बदल बरेच काही सांगून जाणारे आहे. जातीय अंगाने आडवे-उभे धागे अधिक घट्ट होतील. ती वीण राजकीय अंगाने अधिक मजबूत होईल, अशा कार्यक्रमांची रेलचेल वाढू लागली आहे.

कोपर्डी येथील निंद्य घटनेच्या पाश्र्वभूमीवर मराठा समाजाचे एकत्रीकरण आरक्षणाला केंद्रबिंदू ठेवून करण्यात आले. हळुहळू विविध संघटना त्यात उतरत गेल्या. मराठा समाज एकवटतो आहे, असे चित्र निर्माण झाले आणि एक घोषणा नव्याने झाली. ‘नवे पर्व, ओबीसी सर्व’! राजकीय पातळीवर जातीय संघटन मजबूत केले की फायदा होतो की तोटा, याची गणिते मांडली जाऊ लागली आणि जातीय बांधणी दुधारी शस्त्रासारखी असते, असे राष्ट्रवादीचे नेते आवर्जून सांगू लागले. बहुसंख्येने असलेल्या जातींनी आर्थिकदृष्टय़ा मागास असल्याचे सांगत आरक्षणाचा मुद्दा पुढे केला. परिणामी मराठवाडय़ात ध्रुवीकरणाला चालना मिळाली.

अखिल भारतीय तैलिक साहू महासंघ ही संघटना केशरकाकू क्षीरसागरांनी बांधलेली. खरेतर बीडच्या राजकारणात तेली समाजाचा तसा प्रभाव नाही. तरीही ही संघटना पुढे जयदत्त क्षीरसागरांनी टिकवून ठेवली आणि आता अचानक दिल्लीमध्ये जातीय संघटनेचा मेळावा घेतला. त्याला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून क्षीरसागरांना राष्ट्रवादीत डावलले जाते, अशी उघड चर्चा आहे. अगदी त्यांचा पुतण्यालाच राष्ट्रवादीतील नेत्यांचे बळ असल्यामुळे निर्माण झालेल्या गृहकलहाचा परिणाम म्हणून दिल्लीतील मेळाव्याकडे पाहिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केशरकाकू क्षीरसागर यांची राजकीय गणिते या संघटनेभोवती कधीकाळी गुंफली गेली होती, असा दावाही या संघटनेचे पदाधिकारी करतात. त्यामुळेच दिल्लीत क्षीरसागर यांनी आवर्जून मेळावा घेतल्याचे सांगितले जाते.

उस्मानाबाद हे मराठा संघटनांचे जन्मगाव म्हणावे लागेल. अखिल भारतीय मराठा महासंघ आणि संभाजी ब्रिगेड या दोन्ही संघटनांचा प्रभाव आणि विस्तार याच जिल्ह्य़ातून झाला. पुरुषोत्तम खेडेकर तेव्हा उस्मानाबाद जिल्ह्य़ात सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी करायचे. पुढे या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी भांडारकर संस्थेवर हल्ला केला आणि जातीय ध्रुवीकरण टोकदार केले. आता या संघटनेच्या वेगवेगळ्या ३० शाखांमधून जातबांधणीचे काम आरक्षणाची मागणी पुढे करून केले जात आहे.

शिवा, छावा आणि पेशवा या संघटनांकडूनही अधून-मधून कार्यक्रम सुरूच असतात. या वर्षी गुढीपाडव्यादिवशी गुढीऐवजी भगवे झेंडे लावले गेले होते. परशुराम जयंतीचाही उत्साह अचानकच वाढलेला होता. भीमा-कोरेगावनंतर औरंगाबादमध्ये मोठा हिंसाचार झाला होता. त्यानंतरच्या काही दिवसांत किरकोळ कारणावरून औरंगाबादेत दंगलही घडवली गेली. अर्थात त्याला नंतर धार्मिक रंगही दिले गेले. या सर्वाला एकच कारण म्हणजे मराठवाडा सध्या ध्रुवीकरणाची प्रयोगशाळा बनू पाहतो आहे.

जातीय अंगाने विविध कार्यक्रम आखले जात असले तरी अलिकडच्या काळात वर्गीय जाणिवा अधिक तीव्र झाल्या आहेत. विशेषत: शेतकरी, शिक्षक, बेरोजगार अशी त्याची श्रेणी आणि व्याप्ती दिसून येत आहे. त्यामुळे जातीय मेळाव्यांना राजकीय टोक देण्याचा प्रयत्न सुरू असला तरी त्याचा फारसा लाभ सत्ताधारी पक्षाला होणार नाही.

जयदेव डोळे, पत्रकार व राजकीय विश्लेषक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2018 2:28 am

Web Title: marathwada ethnic polarization caste issue
Next Stories
1 गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी उदयनराजे, संभाजीराजे एकत्र
2 आता चिंचोकेही महागले!
3 वळवाच्या पावसाचा तडाखा
Just Now!
X