शासकीय गोदामात काम करणाऱ्या माथाडी कामगारांच्या मजुरीची लाखो रुपयांची चोरी कंत्राटदार वर्षांनुवर्षे करीत आहेत, असा आरोप करून जिल्हाधिकाऱ्यांनी या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी राज्य हमाल मापाडी महामंडळाचे उपाध्यक्ष सुभाष लोमटे यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयावर झालेल्या निदर्शनाप्रसंगी ते बोलत होते.
शासकीय गोदामातील भ्रष्टाचार निपटून काढा, काढलेल्या माथाडी कामगारांना पूर्ववत कामावर घ्या, या काढलेल्या माथाडींची १६ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करा, भाजीमंडईमध्ये माथाडी कायदा लागू करा, वैजापूर गोदामातील माथाडी कामगारांची लेव्ही कंत्राटदारांकडून वसूल करा, पाचोड गोदामातील माथाडी कामगारांची लेव्हीची ९ लाख रुपयांची रक्कम कंत्राटदार राजेंद्र ठाणगे याने माथाडी मंडळात न भरल्याने त्याच्यावर कठोर कारवाई करून सर्व पैसे व्याजासह वसूल करा, अशा मागण्यांसाठी मराठवाडा लेबर युनियनतर्फे निदर्शने करण्यात आली. अतिरिक्त जिल्हाधिकारी सोरमारे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. २० एप्रिलपर्यंत प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
जिल्हा पुरवठा अधिकारी संजय जाधवर, माथाडी मंडळाचे प्रतिनिधी राठोड, हमाल मापाडी महामंडळाचे चिटणीस राजकुमार घयाळ, मराठवाडा लेबर युनियनचे सरचिटणीस देवीदास कीर्तीशाही, अॅड. सुभाष गायकवाड आदी उपस्थित होते.