दोन महिन्यांत दुसऱ्यांदा पेपर व्हॉट्सअ‍ॅपवर फुटला; शिक्षण क्षेत्रात खळबळ

औरंगाबादेत सरलेल्या २०१७ सालात तीन वेळा व नवीन वर्षांच्या पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाला परीक्षेतील पेपरफुटीसह गोंधळ निर्माण होण्यासारख्या आव्हानाला तोंड द्यावे लागले. शहरातील सिडको चौकाजवळील वसंतराव नाईक महाविद्यालयात सोमवारी सकाळी १० वाजता सुरू झालेला मास्टर ऑफ बिझनेस (एमबीए) प्रथम वर्षांचा पेपर अवघ्या दहा मिनिटांत व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून बाहेर आला. अशीच घटना दोन महिन्यांपूर्वी औरंगाबादजवळील शरदचंद्र पवार तंत्रनिकेतन महाविद्यालयातही घडली होती. दोन घटनांमध्ये पेपर फोडण्याचे माध्यम व्हॉटसअ‍ॅपच होते. त्यामुळे मोबाईल परीक्षा केंद्रापर्यंत जातो कसा, असा प्रश्न निर्माण झाला असून, पेपरफुटी रोखण्याचे आव्हान परीक्षा विभागासमोर उभे आहे. नव्या तंत्रज्ञानाला कसे तोंड द्यायचे, असा प्रश्न शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांसमोर निर्माण झाला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा परीक्षा विभाग अलिकडच्या काही परीक्षांच्या काळात उडालेला गोंधळ, ढिसाळ नियोजन व पेपरफुटीसारख्या प्रकारातून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एप्रिलमध्ये सरस्वती भुवन महाविद्यालयात एम.ए.चा मराठीच्या पेपरमधील काही प्रश्नावर ऐनवेळी आक्षेप घेण्यात आले. त्यातील ज्ञानेश्वर, नाथ संप्रदाय, एकनाथ महाराजांशी संबंधित प्रश्न चुकीचे असल्याचे सांगून गोंधळ उडाला. कोणीतरी एकाने त्यासंदर्भात तक्रार केली होती. त्यावर विश्वास ठेवून विद्यापीठाने तातडीने सूत्रे हलवून पेपर सुरू झाल्यानंतर सव्वातासाने दुसरा पेपर पाठवण्यात आला व तो सोडवण्यात यावा, असे सांगण्यात आले. त्यावरून बराच गदारोळ झाला. त्यानंतर औरंगाबाद शहराजवळील चौका येथील साई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे स्थापत्य विभागाचे विद्यार्थी १७ मे २०१७ रोजी मध्यरात्री शिवसेनेचे नगरसेवक सीताराम सुरे यांच्या सुरेवाडी येथील निवासस्थानी चक्क आरामात पेपर सोडवताना आढळून आले होते. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर छापा मारून २४ विद्यार्थी व तीन विद्यार्थ्यांना पुस्तके, मोबाईल, रोख ४० हजारांसह पकडण्यात आले होते. हे प्रकरण विद्यापीठाच्या अंगलट आले होते. कुलगुरूंनाही पोलीस आयुक्तालयाच्या वाऱ्या कराव्या लागल्या. चौकशी समिती नियुक्त करावी लागली. त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. मात्र, विद्यापीठाचे नाव खराब झाले. परीक्षा विभागाच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले. परीक्षा विभाग राजकीय नेत्यांशी संबंधित महाविद्यालयांच्या दबावात असल्याचा आरोप झाला. कारण साईमधील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासह ते उत्तीर्ण होण्यापर्यंत हमी घेतली जायची, हेही त्या घटनेतून समोर आले. विद्यापीठाच्या परिघात ३०० किलोमीटरमधील महाविद्यालये येतात. तेथील प्रश्नपत्रिका घेऊन येण्यासाठी विद्यापीठाकडे अवघी दोनच वाहने आहेत. ही दोन वाहने त्याच दिवशी पेपर घेऊन येऊ शकत नाहीत. तेव्हा महाविद्यालयाच्या परीक्षा विभागावर विश्वास ठेवण्याशिवाय अन्य पर्याय नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी पेपर नंतर विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतला जातो, हे साईमधील प्रकारावरून समोर आलेले आहेच.

दोन महिन्यांपूर्वी औरंगाबादपासून जवळच असलेल्या चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शरदचंद्र पवार तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा पेपर फुटला होता. हे प्रकरण चार-दोन दिवस चच्रेत राहिले. राज्यपातळीवरून एक समिती आली. भेट दिली. चौकशी केली. पुढे काहीच झाले नाही.

पेपरफुटी रोखण्यासाठी व्हॉटसअ‍ॅपसारख्या माध्यमाबाबत काय उपाय शोधता येईल, यावर चर्चा करण्यात येईल. मोबाईल परीक्षा केंद्रापर्यंत नेण्यास प्रतिबंध आहे.  त्यानंतरही विद्यार्थ्यांकडून मोबाईल केंद्रापर्यंत नेऊन पेपर फोडण्यासारखे प्रकार होणे गंभीर आहे.

डॉ. दिगंबर नेटके, परीक्षा विभाग संचालक, विद्यापीठ, बामु.