महायुतीतील सहकारी पक्षांना आम्ही वाऱ्यावर सोडलेलं नाही, ते अजूनही आमच्यासोबतच आहेत. येत्या २४ तारखेला कोल्हापुरात महायुतीची सभा होणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद येथील मेळाव्यात केली.

औरंगाबादमध्ये सध्या भाजपा-शिवसेना युतीचा मेळावा सुरु आहे. मात्र, या मेळाव्यात महायुतीतील सहकारी पक्षाचे नेते रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांची उपस्थिती नाही. त्यामुळे या दोघांना शिवसेना-भाजपाने वाऱ्यावर सोडले असल्याच्या चर्चा सुरु आहेत. यावर मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिलं.

यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शिवसेने-भाजपा युती पक्की झाली त्यावेळी माध्यमांतील काही जणांना जाणीव पूर्वक महायुतीबाबत प्रश्न उपस्थित केला. युती झाली मात्र, महायुतीतील आठवले आणि जानकर सभांमध्ये दिसत नाहीत त्यांना वाऱ्यावर सोडल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, अस नाहीए कारण आठवले आणि जानकर आमच्यासोबत आहेतच. फक्त शिवसेना आणि भाजपात थोडा दुरावा आला होता. तो आधी आम्ही दूर करण्याचा प्रयत्न केला इतकचं. त्यामुळे येत्या २४ तारखेला कोल्हापूरला महायुतीची सभा होणार आहे, त्यावेळी आमचे सर्व साथीदार उपस्थित असतील, असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

यावेळी विरोधकांवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले, विरोधकांनी शेतकऱ्यांसाठी एकदाच ५० हजार रुपयांची कर्जमाफी केली त्यानंतर ते दहा वर्षे हेच सांगत आहेत. मात्र, आम्ही शेवटच्या शेतकऱ्याची कर्जमाफी होईपर्यंत ही योजना सुरु ठेवणार आहोत. या अंतर्गत पुढच्या दहा वर्षात साडेसात लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असतील असा दावा त्यांनी केला.

पाकिस्तानवर सैन्याने केलेल्या कारवायांचे विरोधक पुरावे मागत आहेत. त्यांनी जर आधी सांगितलं असत तर त्यांचा एक माणून बांधून नेला असता आणि त्यांना पुरावा दाखवला असता, असा खोचक टोलाही त्यांनी विरोधकांवर लगावला. तसेच बरं झाल त्यांच सरकार निवडून आलं नाही नाहीतर त्यांनी मसूद अझहरजी, जनरल डायरजी असं सगळ्यांना ते बोलत राहिले असते, अशा शब्दांत त्यांनी राहुल गांधींवर टीका केली. ही जनता देशप्रेमींच्या पाठीशी उभी राहिल त्यामुळे जनताच ठरवेल देशप्रेमी कोण आहे, असे फडणवीस यावेळी म्हणाले.