दुष्काळामुळे तळीरामांचा शौक देशीवरच!
पावसाअभावी पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाल्याने संपूर्ण जिल्हा टँकरच्या मागे धावू लागला असून, पावणेतीनशे छावण्यांमध्ये सव्वातीन लाख जनावरे आश्रयास आहेत. अशाही स्थितीत जिल्ह्यत मद्यविक्रीचा उच्चांक कायम असून, महिन्याला साडेआठ लाख लीटरपेक्षा जास्त दारू विकली जात असल्याची नोंद उत्पादन शुल्क विभागाच्या दफ्तरी आहे. यंदा दुष्काळामुळे तळीरामांवर मात्र विदेशीऐवजी देशीवरच हौस भागवण्याची वेळ आल्याने देशीच्या विक्रीत दुपटीने वाढ झाली आहे. दर महिन्याला साडेआठ लाख लीटर दारू फस्त करण्यासाठी लाखो लीटर पाणी लागते ते वेगळेच.
जिल्ह्यात सलग तीन वर्षांपासून पावसाअभावी दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने यंदा पाणी, चाराटंचाई तीव्र झाली. प्रमुख शहरांसह एक हजार गावांची तहान भागवण्यास ९०० टँकर धावत आहेत. पावणेतीनशे चारा छावण्यांमध्ये सव्वातीन लाख जनावरे आश्रयास आहेत. शेती, साखर कारखानदारी, जििनग उद्योग, कुक्कुटपालनसह अनेक छोटय़ामोठय़ा व्यवसायावरही दुष्काळाचा परिणाम झाला आहे. पण दारूविक्रीवर दुष्काळाचा फारसा परिणाम जाणवत नसल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या नोंदीवरून दिसून येते.
सरलेल्या आíथक वर्षांत तब्बल १ कोटी २ लाख ५२ हजार ५६२ लीटर दारूविक्रीतून ६ कोटी ७६ लाख २५ हजार २५९ रुपयांचा महसूल उत्पादन शुल्क विभागाला मिळाला. काही वर्षांच्या तुलनेत मागील दोन वर्षांत देशी मद्य पिणाऱ्यांची संख्या वाढली असल्याचे दिसून येत आहे. चालू वर्षी देशी मद्य ४८ लाख ७४ हजार ८१३ लीटर, तर विदेशी २४ लाख ७ हजार ३०४ लीटर विक्री झाले.
परिणामी, दर महिन्याला साधारण साडेआठ लाख लीटर मद्य फस्त होते. त्यासाठी लागणारे लाखो लीटर पाणी वेगळे.
दुष्काळी स्थितीमुळे या वर्षी मात्र तळीरामांना आपला शौक देशीवरच भागवावा लागत असल्याने देशीची विक्री दुपटीने झाली. उत्पादन शुल्क विभागाला चालू वर्षीही तब्बल दहा कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले.
मात्र, एकूण स्थिती लक्षात घेता हे उद्दिष्ट गाठणे शक्य नसल्याने त्यांनी तीन कोटींची कपात करून घेतली असली, तरी जिल्ह्यात देशी, विदेशी मद्याची मात्र कुठलीही टंचाई नसल्याचे चित्र आहे.