28 January 2020

News Flash

‘जलशक्ती’तून मराठवाडा कोरडाच!

केंद्रीय मंत्रालयाच्या उपक्रमात पुणे, नाशिक जिल्ह्य़ांचा समावेश

केंद्रीय मंत्रालयाच्या उपक्रमात पुणे, नाशिक जिल्ह्य़ांचा समावेश

सुहास सरदेशमुख, औरंगाबाद

ज्या लातूर जिल्ह्य़ात दुष्काळाच्या काळात रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागला, ज्या विभागात गेल्या दहा वर्षांत चार हजार ५६५ हून अधिक आत्महत्या झाल्या आहेत, जेथे सातत्याने दुष्काळी स्थिती असते, अशा मराठवाडय़ातील सात जिल्ह्य़ांना जलशक्ती मंत्रालयाच्या उपक्रमातून वगळण्यात आले आहे.

महाराष्ट्रातून निवडण्यात आलेल्या आठ जिल्ह्य़ांमध्ये सधन पुणे आणि नाशिक यांच्यासह सांगली, बुलढाणा, सोलापूर, नगर, अमरावती आणि बीड या जिल्ह्य़ांचा समावेश आहे.

मराठवाडय़ाच्या भूगर्भातील तसेच धरणांमधील पाणीसाठय़ाचा विचार करता जेथे जल नाही, त्या भागात या मंत्रालयाचे काम अधिक होण्याची आवश्यकता होती. पण नेमके तेच जिल्हे पहिल्या टप्प्यात दिसून येत नसल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. मराठवाडय़ातील लातूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्य़ांचा जलशक्ती मंत्रालयाच्या उपक्रमांमध्ये समावेश करावा, अशी मागणी छत्रपती संभाजीराजे आणि उस्मानाबादचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्याकडे केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लातूर जिल्ह्य़ातील औसा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलशक्ती मंत्रालय स्थापन केले जाईल, अशी घोषणा केली होती. सरकार आल्यानंतर हे मंत्रालय सुरू झाले खरे, पण त्यात मराठवाडय़ातील बहुतांश जिल्ह्य़ांचा समावेश नाही. सरासरी पाऊसमान घसरल्याने  मराठवाडय़ाची उत्पादकताही घसरली आहे.

पाण्यासाठी मराठवाडय़ात मोठय़ा प्रमाणावर जनचळवळही उभारण्यात आली. सरकारनेही या चळवळीला साथ दिली होती. साडेआठ हजार गावांपैकी ६ हजार २० गावांमध्ये जलयुक्त शिवारची कामे हाती घेण्यात आली. त्यातील ५,२०९ गावे जल परिपूर्ण होतील, एवढे काम करण्यात आले. मात्र, पाऊस नसल्यामुळे सध्या मराठवाडा कोरडा आहे. गेल्या आठवडय़ापर्यंत धरणात अर्धा टक्का पाणीसाठा होता. आता तो पुन्हा कमी झाला आहे. अशी स्थिती सातत्याने असतानाही मराठवाडय़ातील दुष्काळी जिल्हे वगळून जलशक्ती मंत्रालयाने पुणे, नाशिक अशा जिल्ह्य़ांचा समावेश केला आहे. त्यामुळे कोणत्या निकषाच्या आधारे हे जिल्हे निवडले जात आहेत, असा प्रश्न खासदारांना पडला आहे.

दुष्काळग्रस्त भागच का?

’ सध्या पाऊस नसल्यामुळे मराठवाडय़ाची होरपळ

’ अर्धा टक्का असलेला पाणीसाठा आता आणखी घसरला

’ मराठवाडय़ाला हक्काचे २३.२२ अब्ज घनफूट पाणी मिळणे आवश्क होते

’ त्यापैकी केवळ सात टीएमसीचे सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठीच पुरेशी तरतूद केली जात नाही

खासदारांची मागणी

या अनुषंगाने अलीकडेच छत्रपती संभाजीराजे यांनी जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांची भेट घेतली. त्यांनीही उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्य़ांचा समावेश करण्याची मागणी केली आहे. उस्मानाबादचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांनीही लातूर आणि उस्मानाबादचा समावेश करण्याची लेखी मागणी जलशक्ती मंत्रालयाकडे केली आहे.

First Published on July 13, 2019 4:03 am

Web Title: ministry of water resources ignore marathwada seven districts for jal shakti abhiyan zws 70
Next Stories
1 जिल्हा परिषदेच्या सभेत टँकर घोटाळ्यावरून भाजप सदस्य आक्रमक
2 मराठवाडय़ात नऊ हजारांवर अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्य़ांची नोंद
3 २०० रुपयांच्या कर्जफेडीसाठी केनियाचा खासदार तेवीस वर्षांनंतर पोहोचला औरंगाबादेत
Just Now!
X