औरंगाबाद : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरमनसे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवस औरंगाबाद मुक्कामी असल्याने शहरातील विविध चौकात  फलकांवर औरंगाबाद शहराचे नाव ‘संभाजीनगर’ करावे या मागणीचा जोर वाढावा अशी रचना केली. त्याच वेळी या प्रश्नावर शिवसेनेने मात्र मौन पाळले असल्याचे दिसून आले.

औरंगाबाद येथे दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्टय़ातील ‘ऑरिक सिटी हॉल’ची पाहणी आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई यांनी गुरुवारी केली. तसेच महापालिकेच्या विविध कामांचा आढावा घेतला. या बठकीनंतर पत्रकारांनी त्यांना संभाजीनगरच्या मुद्दय़ावरुन छेडले असता ‘राजकारणावर मी नंतर बोलेन. सध्या काम करण्याकडे कल आहे’, असे सांगत प्रश्न टोलवला. नंतरही अन्य एका बैठकीनंतर हाच प्रश्न विचारला असता त्यावर मौन बाळगणेच पसंत केले.

मनसेकडून हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्यानंतर औरंगाबाद येथील महापालिका निवडणुकीमध्ये औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हावे ही मागणी उचलून धरली जाईल, असे अलीकडेच मनसेमध्ये पुन्हा प्रवेश घेतलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले होते. या दौऱ्याची तयारी करण्यासाठी आलेले मनसेचे आमदार राजू पाटील यांनीही ही मागणी विधिमंडळात करू असे सांगितले होते.

महापालिका निवडणुकांची तयारी करण्याच्या दृष्टीने राज ठाकरे औरंगाबाद येथे मुक्कामी येणार असल्याने शहरातील प्रमुख चौकात त्यांना ‘हिंदू जननायक’ अशी बिरुदावली लिहिली आहे.

शहरातील या भगव्या फलकांवरील मुद्दय़ांबाबत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मात्र मौन बाळगणेच पसंत केले. पालकमंत्री सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे यांनी महापालिकांच्या सुविधांबाबतचा आढावा घेतला. येत्या महिनाभरात कारभारात फरक दिसेल, असेही बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांचे जल्लोषात स्वागत

औरंगाबाद शहरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आगमन झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. बाबा पेट्रोल पंपाजवळील चौकात मनसेचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने जमल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. ‘राजसाहब अंगार हैं’ अशा घोषणा देत दुचाकी फेरी काढण्यात आली. शहरातील प्रमुख रस्त्यांवर राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते उभे होते. प्रमुख रस्त्यांवर फटाके वाजवण्यात आले. मनसेचा नवा झेंडा दुचाकींवर लावत मोठय़ा संख्येने कार्यकर्ते स्वागतासाठी तयार होते. गुलमंडी भागात त्यांचे जंगी स्वागत झाले. विविध क्षेत्रांतील मंडळींशी राज ठाकरे पुढील दोन दिवसांत संवाद साधणार आहेत. त्यांच्या समवेत बाळ नांदगावकर, आमदार राजू पाटील, अनिल शिदोरे आदी नेते औरंगाबादेत दाखल झाले आहेत.