अतिवृष्टीमुळे पक्ष्यांचे आगमन लांबण्याची शक्यता 

सुहास सरदेशमुख, लोकसत्ता

औरंगाबाद : जलाशयात पक्ष्यांसाठी अन्नसाखळी तयार होण्यास यंदा अतिवृष्टीमुळे अधिक कालावधी लागणार असल्याने परदेशी पक्ष्यांचे आगमन लांबण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर लहान-मोठे सर्वच जलाशय काठोकाठ असल्याने एकाच ठिकाणी पक्षी निरीक्षणाची संधी हुकू शकते आणि त्यासाठी आणखी भ्रमंती करावी लागू शकते, असे पक्षीतज्ज्ञांचे मत आहे.

जलशयांमध्ये पाण्याचा प्रवाह सुरू असेपर्यंत विविध प्रकारचे शेवाळ तयार होत नाहीत. पाणी स्थिर झाल्यावर वा पातळी घटल्यावर जलाशयाभोवती अन्नसाखळी निर्माण होते. परंतु यंदा पाऊस उशिरापर्यंत थांबल्याने पाणी स्थिरावलेले नाही. परिणामी नोव्हेंबरमध्ये फ्लेमिंगोसारखे देखणे परदेशी पक्षी येतील की नाही, अशी शंका पक्षी निरीक्षकांना आहे. असे असले तरी आता कैकर, सापमान्या, आफ्रिकेतून पावसाळ्यात येणारे चातक, पाणकावळा हे पक्षी मात्र दिसू लागले आहेत.

यंदा राज्यातील जवळपास सर्व जलाशये भरली असल्याने स्थलांतरित पक्षी विखुरलेल्या स्वरूपात आढळतील. सध्या जलाशयांच्या ठिकाणी अनेक जण आवर्जून भेटी देत आहेत. टाळेबंदीच्या काळात अनेकांना पक्ष्यांचे आवाज ऐकण्याची त्यांना पाहण्याची सवयही जडली आहे. त्यामुळे यावर्षी पक्षी निरीक्षणास अधिक चांगले वातावरण निर्माण झाले आहे. पण विविध प्रकारचे पक्षी निरीक्षण आणि अभ्यासासाठी अनेक ठिकाणी फिरावे लागणार आहे.

जायकवाडीसारख्या मोठय़ा धरणांच्या पाणवठय़ाभोवती साधारणत: २०० प्रकारच्या पाणवनस्पती विकसित झाल्याच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. तेथे ६७ प्रकारचे मासेही आढळले आहेत. जायकवाडी परिसरात ८० ते ८४ प्रकारचे स्थलांतरित पक्षी येतात. यामध्ये प्रामुख्याने बदकांच्या १६ जाती आहेत. फ्लेमिंगोसारख्या परदेशातून येणाऱ्या पक्ष्यांबरोबरच सैबेरिया, उजबेकिस्तान येथून पक्षी येतात. यामध्ये बदकांचे प्रकार अधिक आहेत. अणकुचीदार शेपटी असणारा टिनटेल, फावडय़ासारखी चपटी चोच असणारा शॉवेलर यांसह १६-१७ प्रकारचे बदक येतात. गॉडवीट हा भारताच्या उत्तर भागातून आणि मध्य आशियातून येतो. हे पक्षी या वर्षी येण्यास काहीसा विलंब लागू शकतो. सर्व पक्षी सुरुवातीच्या काळात छोटय़ा जलाशयावर थांबतील आणि जसजसे ऊन वाढत जाईल तसा त्यांचा प्रवास मोठय़ा जलाशयाकडे होईल.

अन्नसाखळीस विलंब

अतिवृष्टीमुळे जलाशयांमध्ये पाण्याची आवक सुरू असल्याने अन्नसाखळीसाठी आवश्यक शेवाळ तयार होण्याचे प्रमाण कमी आहे. काठोकाठ भरलेले जलाशय आणि पाण्याचा प्रवाह यांमुळे अन्नसाखळी निर्माण होण्यास विलंब होत आहे. परिणामी, पक्ष्यांचे आगमनही उशिराने होईल. तसेच सर्वच जलाशये तुडुंब असल्याने पक्षीही विखुरलेल्या स्वरूपात आढळतील, असे पक्षीतज्ज्ञांचे मत आहे.

अन्न साखळी तयार होण्यासाठी आवश्यक कालावधी या वर्षी मिळालेला नाही. बहुतेक धरणांतून पाणी सोडावे लागले. त्यामुळे प्रवाह वाहते आहेत. परिणामी शेवाळ किंवा पाणवनस्पती उशिरा तयार होईल आणि पक्षीही मोठय़ा जलाशयांभोवती काहीसे उशिराने येतील.

 दिलीप यार्दी, पक्षीतज्ज्ञ 

सर्वसाधारणपणे राज्यात २०० प्रकारचे शेवाळ किंवा जलवनस्पती आढळतात. त्यातील २६ शेवाळ सर्वत्र आढळतात. साधारणत: शेवाळ विकसित होण्यासाठी दोन आठवडे किंवा काही जलवनस्पतींसाठी २५ दिवस लागू शकतात. अन्नसाखळी त्यावर निर्माण होते. क्लोराफायसी, सॅनोफायसी या प्रवर्गामधील शेवाळ गोडय़ा पाण्यात वाढतात. या वर्षी पाऊस लांबल्याने ही वाढ काहीशी उशिराने होत आहे.

-प्रा. रवी पाटील, विभागप्रमुख, वनस्पतिशास्त्र विभाग, देवगिरी महाविद्यालय