अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येशी संबंधित तपासादरम्यान शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटकेत असलेला अजिंक्य सुरळे आणि शुभम सुरळे यांचा या हत्याप्रकरणात संबंध नसल्याचे पत्र सीबीआयने सरकारी वकिलामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर केले. न्यायमूर्ती मंगेश पाटील यांच्या खंडपीठाने त्या दोघांना प्रत्येकी ५० हजारांच्या व्यक्तिगत जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

दाभोळकर हत्या प्रकरणात सीबीआयने प्रथम सचिन अंदुरे याला अटक केली होती. त्याने दिलेल्या माहितीनुसार, अंदुरे याने लपवण्यासाठी  दिलेली शस्त्रे ही शुभम व अजिंक्य सुरळे यांच्याकडे दिले असल्याचे सांगितले होते. त्यामुळे केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाच्या वतीने सुरळे बंधूंना ताब्यात घेतले. ‘सीबीआय’चे उपअधीक्षक मारुती शंकर पाटील यांच्या तक्रारीवरुन २२ ऑगस्ट २०१८ रोजी त्या सुरळे बंधूं विरोधात सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शुभम आणि अजिंक्य हे दोघं सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणाचा सीबीआयने तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर त्यांनी नियमित जामिनासाठी  जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला. त्या दोघांचा नियमित जामीन अर्ज फेटाळण्यात आला. या निर्णयाविरोधात त्या दोघांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अ‍ॅड. सुरेश कुलकर्णी, अ‍ॅड. बलराज  कुलकर्णी यांच्यामार्फत धाव घेतली.