लोकसभा-विधानसभांच्या रणमैदानात मराठवाडय़ात काँग्रेस-राष्ट्रवादीला धोबीपछाड करून पराभवाची धूळ चाखावयास लावणाऱ्या भारतीय जनता पक्षाला वर्षभरातच झालेल्या नगरपंचायतींच्या निवडणुकीत मात्र पराभवाचा सामना करावा लागला. बीडमध्ये तीन, तर जालन्यात दोन नगरपंचायतींवर राष्ट्रवादीने झेंडा फडकावला. बीडमधील वडवणी, तर लातूरमधील जळकोट नगरपंचायतीत भाजपने वर्चस्व मिळवले.
पालकमंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रितम मुंडे व राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी प्रचारसभांचा धुराळा उडवून राजकीय प्रतिष्ठा पणाला लावलेल्या बीड जिल्ह्य़ातील चारपैकी आष्टी, पाटोदा व शिरूर नगरपंचायतींत राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळवत भाजप नेतृत्वाला पराभवाचा धक्का दिला. वडवणी ही एकमेव नगरपंचायत ताब्यात ठेवण्यात भाजपला यश आले.
भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या जालना जिल्ह्य़ातील घनसावंगी व जाफराबाद राष्ट्रवादीने बाजी मारली. मंठा नगरपंचायतीत शिवसेनेने निर्विवाद बहुमत मिळवले. बदनापूरमध्येही राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र आल्यास त्यांची सत्ता येऊ शकते.
लातूर जिल्हय़ातील उदगीर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या जळकोट नगरपंचायतीत भाजपने झेंडा रोवला. चौरंगी लढतीत भाजपने १७ पकी १० जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली. निलंगा मतदारसंघातील शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीत अॅड. संभाजी पाटील यांच्या पुढाकाराने तयार झालेल्या शहर विकास आघाडीनेही १७ पकी ९ जागांसह एकहाती सत्ता मिळवली. देवणीत भाजप व अपक्ष नागेश जिवणे गट एकत्र आल्यास येथेही भाजपची सत्ता येऊ शकते. चाकूरमध्येही शिवसेना, भाजप व आमदार विनायकराव पाटील यांचा गट एकत्र आल्यास नगरपंचायतीची सत्ता हाती येऊ शकते.
परभणी जिल्ह्य़ातील पालम नगरपंचायत निवडणुकीचा निकाल धक्कादायक लागला. चच्रेत असणाऱ्या भाजप, राष्ट्रवादीला या निकालाने चांगलाच धक्का दिला. १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत घनदाट मित्रमंडळाने ६ जागा जिंकत बाजी मारली खरी; मात्र, बहुमतासाठी मित्रमंडळाला इतरांची मदत घ्यावी लागणार आहे.