माजी जि. प. अध्यक्ष विटेकरांनी घेतली पवारांची भेट

परभणी जिल्ह्यत लोकसभा निवडणुकीच्या घडामोडींनी आतापासूनच वेग घेतला असून उमेदवारी डोळ्यासमोर ठेवून राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांनी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन विकास प्रश्नासंबंधी निवेदन दिले असले, तरीही या घटनाप्रसंगाचे राजकीय तर्क लावले जात आहेत. लोकसभेसाठी विटेकरांची ही साखरपेरणी असल्याचे मानले जात असून राष्ट्रवादीच्या वतीने तेच लोकसभेचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरतील, असाही अंदाज लावला जात आहे.

जिल्ह्यत विविध राजकीय पक्षांच्या इच्छुकांनी लोकसभा व विधानसभेसाठीही मोच्रेबांधणी सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या या मतदार संघात राष्ट्रवादीच्या वतीने आता उमेदवार कोण असाही प्रश्न गेल्या काही दिवसांत निर्माण झाला आहे. मागील लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या आमदार विजय भांबळे यांनी जिंतूर विधानसभा मतदार संघात निवडणूक जिंकून सध्या मतदार संघापुरतेच लक्ष मर्यादित ठेवले आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असताना भांबळे यांचा संपूर्ण परभणी जिल्ह्यशी संपर्क होता. आता पक्षाचे जिल्हाध्यक्षपद आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्याकडे आहे. तर जिल्हा परिषदेतील सत्ता आ.भांबळे यांच्याकडे आहे. शिवसेनेला शह देणारा उमेदवार कोण याचा शोध राष्ट्रवादीत सुरू झाला आहे.

पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी हे येणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत आपला स्वतचा मार्ग मोकळा करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत. पाथरी विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांना मोकळीक देऊन स्वतच्या विधान परिषद निवडणुकीतील अडथळे दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. विटेकर यांनी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेऊन विविध मागण्यांमध्ये जिल्ह्यतील बंद साखर कारखाने  चालू करण्यात यावेत, अशीही एक मागणी निवेदनात नमूद केली आहे. जिल्ह्यतील रस्त्यांच्या प्रश्नासह ऊस उत्पादकांचा प्रश्नही गेल्या काही वर्षांपासून तीव्र असतांना नेमके आताच पक्षाच्या अध्यक्षांना निवेदन देण्याचे कारण काय?  निवेदन हे निमित्त असले तरीही लोकसभेची मोच्रेबांधणी हाच या भेटीमागचा उद्देश असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

विटेकर हे जर लोकसभेचे उमेदवार असतील, तर वरपुडकरांच्या पाथरी विधानसभा मतदार संघातला अडथळा दूर होणार आहे. त्यामुळे वरपुडकरही त्यांना सहकार्य करतील असा राजकीय अंदाज बांधला जात आहे. गेल्या काही महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षातंर्गत धुसफूस खदखदत आहे. विटेकर हे गेल्या काही दिवसांत राजकीय घडामोडीत सक्रिय नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेसकडे सध्या लोकसभेसाठी विविध नावे चच्रेत असली, तरीही विटेकर हे नेमके आताच सक्रिय झाल्याने त्यांच्या हालचालींचा उद्देश लोकसभेशी जोडला जात आहे.