औरंगाबाद : वृत्त वाहिन्यांकडून कोविडविषयक वृत्तांचा होणारा अतिरेक थांबवण्याची विनंती करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. श्रीकांत डी. कुलकर्णी यांनी नुकतीच नामंजूर केली आहे. याचिका नामंजूर करताना न्यायालयाने म्हटले आहे की, सत्य आणि अचूक बातमी दाखवण्यापासून माध्यमांना प्रतिबंधित करता येत नाही. त्यामुळे ही याचिका खर्चासह फेटाळण्यात येते.

येथील व्यापारी अमित कांतीकुमार जैन यांनी अ?ॅड. कुलदीप कहाळेकर यांच्यामार्फत खंडपीठात ही जनहित याचिका दाखल केली होती. जैन यांच्या याचिकेनुसार हिंदी, मराठी, इंग्रजी माध्यमाच्या वृत्तवाहिन्यांमधून दिवसभरात किमान १२ तास करोनाविषयक बातम्या सतत दाखवण्यात येतात. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात आजाराविषयीची भीती वाढत जाते. शिवाय यामुळे कोविडविषयी गैरसमजही निर्माण होत आहेत. सतत स्मशानभूमीतील पेटत्या चिता, रुग्णालयाबाहेर रडणारे नातेवाईक हे दाखवले जात आहे. यामुळे नागरिकांचे विचार नकारात्मक होतात, असे याचिकेत म्हटले आहे.

न्यायालयाने याचिका फेटाळताना म्हटले आहे, की कोविडशी संबंधित खळबळजनक बातम्या दाखवण्यापासून माध्यमांना, दूरचित्रवाहिन्यांना प्रतिबंधित करा व त्याकरिता नियामक मंडळ स्थापन करा असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते परंतु आम्ही अशा याचिकेची जनहित याचिका म्हणून कल्पना करू शकत नाही. कारण याचिकाकर्ता हा वृत्तवाहिनीने खोटी बातमी दाखवली किंवा कोणती विशिष्ट बातमी खळबळजनक दाखवली, अशी तक्रार घेऊन आलेला नाही. शिवाय सत्य आणि अचूक बातमी दाखवण्यापासून माध्यमांना प्रतिबंधित करता येत नाही, त्यामुळे ही याचिका खर्चासह फेटाळण्यात येते.