मंत्रिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकटे पडत असल्याचे चित्र दिसत आहे. अर्थात आघाडी सरकारच्या काळात ‘आमचे’ही संबंध किती मधुर होते, हे सर्वाना माहीत आहे. पण तशीच काहीशी स्थिती असल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे व्यक्त केले. बीड जिल्हय़ातील दुष्काळ योजनांची पाहणी केल्यानंतर अयोग्य नियोजनामुळे मराठवाडय़ाची देशभर बदनामी झाली. त्यामुळे येत्या काळात या भागात उद्योग येतील की नाही, याविषयी चिंता वाटत असल्याचेही ते म्हणाले.
दुष्काळाला हाताळत असताना मंत्रिमंडळाचा सांघिकपणा कसा जाणवतो, असा प्रश्न विचारला असता पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘आघाडीच्या काळात आमचे काही मधुर संबंध होते, असे नाही.’ असे सांगत अप्रत्यक्षपणे कामकाजात ते एकटेच होते, असे त्यांनी सुचविले. तेच चित्र सध्याही जाणवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारला दुष्काळ निर्मूलनाच्या उपाययोजनेत पूर्णत: अपयश आल्याचा ठपका त्यांनी या वेळी ठेवला. आघाडीच्या काळात आम्ही उस्मानाबादला पाणी देऊ शकलो. मग या सरकारला ते लातूरला का देता आले नाही. रेल्वेने पाणी आणून त्याच्या केलेल्या जाहिरातबाजीमुळे मराठवाडय़ात अजिबात पाणी नाही, असा संदेश गेला आहे. त्यामुळे मराठवाडय़ात व विशेषत: औरंगाबादमध्ये किती उद्योग येतील, या विषयी चिंता वाटते, असेही ते म्हणाले. अलीकडच्या काळात न्यायालयाने दिलेल्या काही निर्णयांवरही त्यांनी भाष्य केले. धोरण म्हणून राज्य सरकारने काही पावले उचलण्याची आवश्यकता होती.